नांदेड। विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी शै. वर्ष २००६ मध्ये राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.चालू वर्षी शै. वर्ष २०२२-२३ साठी या स्पर्धेचे आयोजन पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठमध्ये जानेवारी २०२३ मध्ये होणार आहे. त्यापूर्वी ही स्पर्धा महविद्यालय,जिल्हा, विद्यापीठ व राज्यस्तरीयपातळीवर आयोजित करण्यात येते. या राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये मानव्य भाषा व कला, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषधनिर्माणशास्त्र आणि शेती व पशुपालन अशा सहा विद्याशाखांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागृत करण्यासाठी व त्यांच्या कल्पनांना योग्य रीतीने मांडण्यासाठी अविष्कार संशोधन महोत्सव हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून सध्याच्या प्रतिभाशाली युवकांना त्यांच्यातल्या कौशल्य, प्रयत्न आणि ऊर्जेच्या मदतीने उद्याचे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्राप्त होते. असे प्रतिपादनही त्यांनी केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. संजय पेकमवार, प्रा. डॉ. जी. कृष्णा चैतन्य व प्रा. डॉ. शैलेश पटवेकर हे विद्यापीठ समन्वयक व सहसमन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेच्या आयोजनासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सायन्स कॉलेज (नांदेड), परभणी जिल्ह्यासाठी बी. रघुनाथ महाविद्यालय (परभणी), लातूर जिल्ह्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय (लातूर) व हिंगोली जिल्ह्यासाठी नागनाथ महाविद्यालय (औंढा नागनाथ) या महाविद्यालयाची निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे जिल्हानिहाय आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहे. दि.१४ ऑक्टोबर २०२२ लातूर, दि. १५ ऑक्टोबर परभणी, दि.१७ ऑक्टोबर नांदेड व दि. १८ ऑक्टोबर २०२२ हिंगोली येथे करण्यात आलेले आहे.
जिल्हास्तरीय पातळीवर निवड झालेले विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक यांचे विद्यापीठस्तरीय आविष्कार-२०२३साठीची स्पर्धा दि. १९ व २० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी दु. ०२:०० वा. तज्ज्ञांचे ऑनलाईन माहितीपर मार्गदर्शन आयोजित केले आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जावून सहभागी होता येईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी www.srtmun.ac.in या संकेतस्थळ वर भेट द्यावी. या स्पर्धेमध्ये संबंधित जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन विद्यापीठ समन्वयकांनी केली आहे.