जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्वपूर्ण संविधानरुपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्य रत्न आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले भारतीय संविधान संमत झाले मात्र त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. यास 68 वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारतीय संविधान हे इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रतही कायदेशिरदृष्ट्या ग्राह्य आहे. जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व असलेले आपले
संविधान म्हणजे तमाम भारतीयांचा अभिमान आहे आणि म्हणूनच आपण “अभिमान आम्हाला संविधानाचा... समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा’’ असे अभिमानाने म्हणू शकतो. भारताचे संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. आज जवळपास 68 वर्षांपासून डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या या संविधानाच्या आधारे आपले भारतीय संघराज्य व व्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आणि तद्नंतर म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष डॉ. एस. सी. मुखर्जी व सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड करण्यात आली. या समितीत प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राधाकृष्णनन, के. एम. मुन्शी व डॉ. जयकर यांचा समावेश होता. या समितीने संविधानाच मसुदा तयार करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली. या समितीने अखंड मेहनत घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली.
या समितीने घटनेमध्ये आपल्या जन-गण-मन या गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताला राष्ट्रगीताचा सन्मान दिला तसेच राष्ट्रध्वजाचीही निर्मिती करण्यात आली. घटनेच्या पहिल्या मसुद्यामध्ये 315 कलमे व 7 परिशिष्ट होती पुढे त्यात वाढ झाली. या संविधानाची उद्देशिका पुढीलप्रमाणे आहे. "आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता: निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन, आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत." यात नमूद केले आहे की आपला देश हा सार्वभौम (Sovereign), समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular) आणि प्रजासत्ताक (Republic) आहे. या उद्देशिकेच्या प्रत्येक शब्दातून आपणास संविधानाची महती लक्षात येते.
संविधानाची दिव्यता
भारताचे संविधान म्हणजे राज्यघटना संदर्भात विविध वैशिष्ट्ये आहेत. यात प्रामुख्याने संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुध्द हक्क, धर्मस्वातंत्र्यांचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक उपाययोजनेचा हक्क, विवक्षित कायद्यांचे व्यावृत्ती, त्याचप्रमाणे राज्य धोरणांची निदेशक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य, राज्य, त्याची कार्यपध्दती, न्यायालये, न्यायाधिकरणे, निवडणुका, आणीबाणी, राज्यभाषा या खेरिज संकीर्ण यात उर्वरीत सर्व विषय समाविष्ट होतात. अशा सर्व स्तरावरील बाबींचा समावेश आहे. भारतीयांना त्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा अथवा जगण्याचा अधिकार, हक्क याचे स्पष्ट व सखोल मार्गदर्शन या घटनेत आहे. त्यामुळे ही घटना प्रत्येक भारतीयाला आपलीच वाटेल अशी आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम, अधिकार, कर्तव्ये, लोकांचे सार्वभौमत्व आदी यात आहे. 26 जानेवारी 1950 पासून या घटनेनूसारच आपल्या भारत देशाचा राज्यकारभार सुरू झाला. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो.
17 डिसेंबर 1946 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेले या संदर्भातील त्यांचे पहिले भाषण अत्यंत महत्वपूर्ण असे आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अकस्मातपणे डॉ.बाबासाहेबांचे नाव भाषणासाठी पुकारले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी अमोघ असे भाषण केले. या भाषणाचे वर्णन करताना श्री. न. वि. गाडगीळ म्हणाले की, " त्यांचे भाषण इतके मुत्सद्याला शोभणारे होते, इतके कटुतेशिवाय, इतके प्रामाणिक आवाहन करणारे होते की, संपूर्ण सभागृह मतिगुंग झाल्याप्रमाणे ऐकत होते". संविधान सभेमध्ये अशा प्रकारे पहिलेच भाषण प्रभावीपणे करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची महती स्पष्ट केली. एकसंघ भारताच्या उन्नतीची धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीमागे होती. 10 जून 1950 रोजी सिलोन दौऱ्यावरुन परत येतांना त्रिवेंद्रम येथे लेजिसलेटिव्ह चेंबरमध्ये त्यांनी एक भाषण केले. त्या भाषणात अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे "घटनात्मक नितीचे काटेकोरपणे पालन करा". यावेळी बोलताना ते म्हणाले, "प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशाला पार्लमेंटरी लोकशाहीची पध्दत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे- सरकार बनविण्याच्या पध्दतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्याकांच्या नियमाचे पालन"
घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने, भारतीय राज्यघटना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला देऊन जागतिक पातळीवर भारतीय सार्वभौमत्वाचे गौरवचिन्ह निर्माण केलेले आहे. केवळ संविधानच नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचारही तेजस्वी, प्रखर व मौलिक असे आहेत. या संविधान दिनाच्या निमित्ताने राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संविधान दौड व गौरव यात्राचे आयोजन केले आहे.
संदर्भ :1) बोल महामानवाचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 500 मर्मभेदी भाषणे-(खंड दोन) डॉ.नरेंद्र जाधव-ग्रंथाली प्रकाशन मुंबई, 2) भारताचे संविधान (The Constitution of India)- संकलन-राजेश अशोक चौधरी, चौधरी लॉ पब्लिशर्स जळगाव, डॉ.राजू पाटोदकर मो.9892108365