नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र विभागातील पूर्व कार्यरत असलेले प्रा. डॉ. राजेश गच्चे, संशोधक डॉ. सोनाली कांबळे व रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भास्कर दवणे यांच्या संशोधनाला भारत सरकारकडून नुकतेच एकस्व (पेटंट) प्रदान करण्यात आले आहे. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) विरोधी वनस्पती रूपी औषधी निर्मिती संबंधित संशोधन त्यांनी केले आहे.
या संशोधनकार्यातील संशोधक डॉ. सोनाली कांबळे यांनी प्रा. डॉ. राजेश गच्चे व प्रा. डॉ. भास्कर दवणे यांच्या संशोधन मार्गदर्शनाखली आपल्या पीएचडी संशोधन कार्यादरम्यान विविध भागातील आढळणाऱ्या वनस्पतीचा अभ्यास करून एक नाविन्यपूर्ण वनस्पतीनिर्मित स्तन कर्करोग विरोधी औषधी चा शोध लावला. या उपचार पद्धतीमध्ये वापरण्यात आलेली वनस्पती क्लोरोझायलॉन स्वीटेनिया (बेहरू) ही स्तन कर्करोगांच्या पेशींवरती अत्यंत प्रभावी पणे कार्य करते.
संशोधनादरम्यान या वनस्पतीचा वापर करून विशिष्ट प्रकारचे हर्बल फॉर्मुलेशन तयार करण्यात आले व स्तन कर्करोगाच्या पेशींवर विविध तपासण्या घेतल्या असता हे हर्बल फॉर्मुलेशन स्तन कर्करोगाच्या पेशींना मारण्यात अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. याच नावीन्यपूर्ण संशोधनास राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव २०१९ मध्ये मेडिसिन अँड फार्मसी या श्रेणी मध्ये विद्यापीठास द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
या त्यांच्या यशामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले व भविष्यात प्राध्यापक व संशोधक विध्यार्थ्याकडून अजूनही समाज उपयोगी संशोधन होईल आणी त्याला पेटंट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी विद्यापीठाचे दुरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलानी, डॉ. भास्कर दवणे, डॉ. गजानन झोरे व डॉ. राजाराम माने उपस्थित होते.