गढीवरचा रझाकारी लढा ....ना चिरा..ना पणती.....! - NNL


मराठवाडा मुक्ती संग्रामा लढ्यात लोह्यातील गढीवरचा रणसंग्राम इतिहासात नमूद आहे.या स्वतंत्र लढ्यातील ही भूमी रझाकाराशी लढताना हौतात्य पत्करणाऱ्या वीरांच्या बलिदानाने अजरामर  झाली आहे.ज्या गढीवर हे वीर रझाकाराशी लढता लढता धारातीर्थी पडले ती गढी आता नामशेष झाली .इतिहासाच्या पाऊल खुणा फुसल्या गेल्या.ना चिरा..ना पणती..ना वास्तू ..अशी गत या भूमीची ... .नवपिढीला ही वास्तू पहाता नेण्याचे भाग्य आता मिळणार नाही. तीन हुतात्म्यांच्या या भूमीतब ना स्तंभ उभा केला नाही येथे स्मृती जागविल्या..    

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढयात लोह्यातील  निजामकालीन गढीवर रझाकरांनी  शस्‍त्र हल्‍ला केला.यात बळवंतराव दत्‍तात्रेय मक्‍तेदार व पंडितराव किशनराव मक्‍तेदार यांच्‍यावर रझाकारांनी गोळया झाडल्‍या त्‍यातच त्‍यांना वीरगती प्राप्‍त झाली वीरमरण आले. ही घटना जुन १९४७ मधील रझाकरा विरुध्‍द लढताना धारातीर्थी पडलेल्‍या वीरजवानांच्या बलिदानाने ही भूमी अजरामर झाली. निजामकालीन कंधारचा सरदार गोपालसिंह गौडवाला यांच्‍या काळात सोळाव्या शतकात  जुन्या लोहयातील बुरुज गढी उभारण्‍यात आली होती. या गढीत दहा बुरुजापैकी पाच बुरुज इतिहासाची साक्ष देत कोरोनाच्या पहिल्या लाटे पर्यंत  उभे होते दगडी दरवाजे... वर नक्षी काम आणि आतील भाग... किल्ल्या सारखा तो गतकालीन इतिहासाची साक्ष देणारा होता. शतकापूर्वी अमृतराव बळवंतराव मक्‍तेदार व पंडितराव मक्‍तेदारअसा मोठा परिवार या गढीत राहायचा. दोन गावची मक्‍तेदारी आणि सहा गा वाची वतनदारी  होती.गढीवरील मक्‍तेदार कुटुंब संपूर्ण गावात, सर्वांशी प्रेमाने, सहकार्याने वावरत होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढयाला सुरुवात झाली ती जुन १९४८मध्‍ये. दीडशेहुन अधिक रझाकार लोहयात खंडोबाच्‍या माळावर उतरले( सध्याची नगर पालिका पाणी पुरवठा टाकी) आल्‍याची खबर कोंडिबा जंगले यांनी गढीवर येऊन दिली. रझाकारांनी गढीवर दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्‍या सुमारास सशस्‍ञ हल्‍ला गेला.गावात येणाऱ्या वाटा बंद केल्‍या होत्या प्रत्‍येक बुरुजावर सशस्‍ञ रझाकार तैनात केले होते. त्या क्षणाच्या आठवणीने आजही शरीराचा थरकाप उडतो, असे या घटनेचे प्रत्‍यक्ष साक्षीदार होते ( बापुसाहेब मालक कुलकर्णी हे आता हयात नाहीत)


रझाकारांनी गढीवर प्रवेश केला.बळवंतराव ( चिमणराव ) मक्‍तेदार आणि पंडितराव मक्‍तेदार यांना मारहाण केली दोघांनाही वाडयात खांबाला बांधले( वरवंटा )बंदुकीचा दस्‍त्‍याने मारहाण केली  अर्धमृत अवस्थेत या दोघांनाही  सोडुन रझाकरा गेले खरे पण पुन्‍हा परत आले. दोघांना गोळया झाडुन ठार केले. स्‍वातंञ्यालढयात दोघांनाही वीरमण आले. त्‍यांनतर रझाकारांनी गढीतील सोने, चांदी, नगदी पैसे ,कपडे असा तीन चार लाख रुपयांचा ऐवज पोत्‍यात, बारदाण्‍यात घालुन लुटुन नेला. पंडितराव व बळवंतराव या दोघांच्‍या मृतदेहास पंचनामा तहसीलदार फरीद मिर्झा यांनी केला. रझाकारांचा गोळीबार सुरु असताना वाडयातील सर्व जण कोठयाच्‍या मळयाकडे ( सद्याचा बेनाळ रोड ) गेले. त्यांनी राञ तिथेच काढली, .इतर   लोक गाव सोडुन  पळुन गेले होते   गढीवर गोळीबार केल्‍यानंतर विश्‍वनाथराव सुर्यवंशी ( माजी नगराध्‍यक्ष कल्‍याण सुर्यवंशी यांचे वडील ) यांच्‍या घराकडे रझाकारानी मोर्चा वळविला त्‍या वेळी माधवराव नळगे-लक्ष्‍मण नळगे यांनी रझाकारां आव्हान दिले. मराठगल्ली, विठ्ठलवाडी भागात असलेल्या त्यांच्या वाड्याच्या गच्चीवरुन रझाकारांवर गोळीबार केला. त्यांना मदत करणारे लक्ष्मण नळगे रझाकारांच्या गोळीबारात शहीद झाले.रझाकारांनी नळगे यांच्या वाड्यास आग लावली.

कंधार तालुक्यातील रझाकारी चळवळीमुळे त्रस्त झालेल्या तत्कालीन तहसीलदार  फरीद मिर्झा यांनी आपल्या नौकरीचा राजीनामा दिला होता निझामाच्‍या जुलूमी राजवटीविरुध्‍द संघर्ष करणारी ही भुमी आहे .तीनशे साडे तीनशे  वर्षापुर्वी बांधण्‍यात आलेल्‍या या लोह्यच्या ऐतिहासिक गढीवर रझाकारांशी लढताना दोन वीरांना हौतात्‍म्‍य प्राप्‍त झाले. गढी आता नामशेष झाली  पण आजही आठवणी आजही  ताजा होतात. ना येथे चिरा ... नाही येथे पणती आणि आता तर वास्तूही नाही अशी आवस्थ आहे. हुतात्माचे स्‍मारक व्हावे यासाठी भाई केशवराव धोंडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आज ही करत आहेत .पण निद्रिस्त प्रशासन जागे झालेच नाही. या घटनेचे साक्षीदार आज हयात नाहीत पण बापुसाहेब मालक कुलकर्णी यांच्‍यासह आठवणी लिहुन ठेवणारे संजय मक्‍तेदार यांच्‍यामुळे अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळाला. सेवा निवृत्त राज्याचे कृषि आयुक्‍त कृष्‍णा लव्‍हेकर, डॉ. लक्ष्‍मीकांत लव्‍हेकर, डॉ.श्रीकांत लव्‍हेकर, यांचे पंडितराव मक्‍तेदार या रझाकराशी लढताना या भूमीसाठी बलिदान दिले ते  आजोबा होते  डॉ. रमेश लव्‍हेकर, नंदकुमार लव्‍हेकर, ही बळवंतरावांचे  चिरंजीव . 

शहराच्‍या सौंदर्यात भर टाकणारी ही वास्तू -बुरुज एकेकाळी शहराची ओळख होती. हा ऐतिहासिक  वारसा आता नामशेष झाला इतिहासाच्या खुणा असलेल्या या जागेवर आता सपाटीकरण झाले आहे   (पूर्वीचा  गढी-बुरुज राहिला नाही) हुतात्‍मा स्‍मारक उभारून या पुरातन गढीचे संरक्षण करायला हवे.होते पण मालकी असल्याने ते शक्य झाले नसावे. सेवानिवृत्त सहकार अधिकारी कै आप्पाराव चव्हाण हे  गावातील हा रणसंग्राम अनेकदा नव्या पिढीला  सांगायचे पण  तेही काळाआड गेले .नव्या पिढीला आपल्या गावाच्या इतिहासाची आठवण  व्हावी यासाठी आता कोणालाही काहीच सोयरसुतक नाही .

मराठवाडा मुक्ती लढ्यात 1940 दशकात आर्य समाज चळवळ निजामशाही विरोधात कार्यरत होती. जातीभेद विरहित कार्य राष्ट्रीय स्तरावर चालू होते. मराठवाड्यातील, लातूर, उस्मानाबाद, उमरगा याभागात चळवळ सक्रिय होती. दलीतब समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात या चळवळीत सहभागी झाले.लोह्यात कालवश संभाजीराव धुतमल यांच्या वाड्यात उदगीर येथील रामराव मास्तर व त्यानंतर मारुती मास्तर याना संभाजीराव धुतमल यांचे चुलते व वडील यांनी लोह्यात त्याच्या वाड्यात लेकरांना शिकविण्यासाठी त्या काळात आणले होते रामराव मास्तर हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते लोह्यातील तरुणांना ते उदगीर येथे घेऊन गेले तेथे आर्य समाजाची बैठक होती त्याच वेळी या तरुणांनांचा सक्रिय सहभाग होता बरेच दिवस हे तरुण कार्य करत होते त्यांनाअटक झाली  रझाकरांनी त्यांना तुरुंगात डांबले. 

मराठवाडा मुक्त झाला आणि या लोह्याच्या भूमीपुत्राचा या लढ्यात यश मिळाले  त्यांना पुढे स्वातंत्र सैनिक म्हणून सरकारने गौरविले असे वयाची ऐंशी ओलांडले सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव  धुतमल गुरुजी सांगतात. लोह्यातील  स्वा. सै विठ्ठलराव पेनुरकर, बाबुराव काळेगोरे, बळीराम संगेवार, हरी रामा महाबळे, विश्‍वनाथ महाबळे, माधवराव महाबळे,राम पोटदुखे, नेमीनाथ अन्‍नदाते, बलभिमराव लव्‍हेकर, माधवराव धुतमल, सोपान मास्तर महाबळे, ग्यानोबा धुतमल ,लक्ष्मणराव  नळगे, यांनी भाग घेतला होता. हे स्वातंत्र्य सैनिक  आज ह्यात नाहीत पण शासकीय पातळीवर आजच्या दिवशी( १७ सप्टेंबर)  त्यांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात येतो.

लोह्याची भूमी हि मुक्ती संग्राम लढ्यातील पावन भूमी. ज्या मातीने रझाकारी राजवटीतून मुक्त करण्यासाठी तीन वीर गमावले त्या पावन भूमीत या वीरांचे स्मारक व्हायला पाहिजे ते आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे पण ना याची कोणाला आठवण नाही याची खंत वाटते .या  लढ्यातील गढी कायमची नष्ट झाली फक्त आठवणी व इतिहास तेवढा शिल्लक आहे. शूर वीरा... जिथे जाहला ..तुझा जीवनांत.. स्तंभ तिथे ...ना बांधला..पेटली न वात..अशी अवस्था या विरभूमीची..!

●हरिहर धुतमल, लोहा, जी.नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी