‘गरबा खेळणे’ म्हणजे काय ? - ‘गरबा खेळणे’ यालाच हिंदु धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे’, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय.
गरबा दोन टाळ्यांनी खेळावा कि तीन टाळ्यांनी खेळावा ? - नवरात्रीमध्ये कलेकलेने श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व जागृत होत असते. ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश या ईश्वराच्या तीन प्रमुख कला आहेत. देवीचे मारक रूप या तीनही कलांच्या स्तरावर जागृत होण्यासाठी तीन वेळा टाळ्या वाजवून ब्रह्मांडातील देवीची शक्तीरूपी संकल्पशक्ती कार्यरत केली जाते; म्हणून तीन टाळ्यांच्या लयबद्ध हालचालीतून देवीचे गुणगान करणे अधिक इष्ट आणि फलदायी ठरते. तीन टाळ्यांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
अ. पहिली टाळी ही ब्रह्माशी, म्हणजेच इच्छाशक्तीशी संबंधित आहे. यामुळे ब्रह्मांडातील ब्रह्माच्या इच्छालहरी जागृत होऊन जिवाच्या भावाप्रमाणे त्याच्या मनातील इच्छेला अनुमोदन देतात.
आ. दुसर्या टाळीच्या माध्यमातून विष्णुरूपी कार्यलहरी प्रत्यक्ष इच्छारूपी कर्म घडण्यासाठी जिवाला शक्ती प्रदान करतात.
इ. तिसर्या टाळीच्या माध्यमातून शिवरूपी ज्ञानलहरी प्रत्यक्ष कार्य घडवून त्यातून निर्माण होणार्या परिणामातून जिवाला इच्छित फलप्राप्ती करून देतात. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होऊन देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. ‘टाळ्या वाजवणे’, हे तेजाच्या आराधनेचे दर्शक आहे. टाळ्या वाजवून गोलाकार फेर धरून मंडल करून देवीतत्त्वाला आवाहन करणारी भक्तीयुक्त भजने म्हटल्याने देवीप्रती भाव जागृत होण्यास साहाय्य होते.
गरबा खेळणे हे घटाचे प्रतीक असणे - गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.’
गरबोत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा ! - पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. ‘रिमिक्स’, पाश्चात्त्य संगीत किंवा चित्रपटगीते यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करत गरब्याच्या नावाखाली ‘डिस्को-दांडीया’ खेळला जातो. या वेळी अनैतिकतेला उत्तेजन देणारी उत्तेजक वेशभूषा आणि स्त्री-पुरुषांचे नृत्य, तसेच व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण आदी प्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे.’
संदर्भ : सनातन -निर्मित ग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180