अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा- सीईओ वर्षा ठाकूर- घुगे यांचे आवाहन
नांदेड| शाश्वत स्वच्छतेसाठी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशभरात दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात जिल्हयातील नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपले गाव, शाळा-अंगणवाडी व परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
आज बुधवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, नारायण मिसाळ, रेखा काळम- कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कृषी अधिकारी चिमणशेट्टे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय चौधरी, डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध अभियान राबविण्यात येतात. लोकसहभाग ज्या गावात मिळाला त्या गावांचा कायापालट झाला आहे. स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानातून गावस्तरावर स्वच्छते विषयी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी अधिकारी व कर्मचा-यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी केले. यावळी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
गावागात महाश्रमदान; शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग
आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी स्वच्छतेची शपथ घेवून स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाची तालुका व गावा-गावात सुरवात करण्यात येणार आहे. यात स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नाविन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा संकल्प केला जाणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी दिली आहे.
विविध माध्यमांतून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासोबत पाण्याचे स्त्रोत तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 पर्यंत चालेल. यात दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी जागरुकता अभियान, दिनांक 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता सेवा दिवस, दिनांक 19 सप्टेंबर रोजी गावस्तरावर प्लास्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन, दिनांक 18 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये गावातील सार्वजनिक शौचालय, बस स्थानक, बाजारपेठ ठिकाण, पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छता, 24 सप्टेंबर रोजी समग्र स्वच्छता, दिनांक 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्वत्र स्वच्छता, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पर्यटन ठिकाणाची स्वच्छता उपक्रम, तर दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी तालुका व गावस्तरावर महाश्रमदान तसेच स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यासाठी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी योग्य नियोजन करुन शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार उपक्रम राबवावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.