साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जाहीर -NNL


नांदेड।
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना, सव्वाशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ह्या पुरस्कारासाठी डॉ. सावंत यांच्या 'वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती' ह्या अपारंपरिक विषयावरील संशोधनपर ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ह्या ग्रंथात डॉ. सावंत यांनी बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध अधोरेखित केला आहे. 

डॉ. सावंत यांची कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य आणि संपादन इ. वाङ्मयप्रकारांतील ४५ पुस्तके प्रकाशित झाली असून शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या काही कविता व लेख समाविष्ट आहेत. 'डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितेचा चिकित्सक अभ्यास' ह्या विषयावर प्रबंधिका लिहून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी प्राप्त केली आहे. 

ना. शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ( २०१९) डॉ. सावंत यांनी संपादित केलेला 'आधुनिक भगीरथ' हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. सावंत यांना राष्ट्रपती पुरस्कारासह साहित्यासाठी प्रतिष्ठित साहित्य संस्थांच्या ३० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

डॉ. सावंत यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सावंत यांना गतवर्षी नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार ( जीवनगौरव) प्राप्त झाला आहे. 

विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक साहित्य संमेलने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन समारंभांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. डॉ. सावंत यांनी शंभरावर पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत, पुस्तकांची पाठराखण केली आहे. 

नोव्हेंबर २०१९मध्ये जळगाव येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. आचार्य विनोबा भावेप्रणीत सर्वोदय आश्रम ह्या संस्थेतर्फे डॉ. सावंत यांना 'आचार्य' उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. एक उपक्रमशील व प्रयोगशील मुख्याध्यापक तथा शिक्षणतज्ज्ञ असा त्यांचा लौकिक आहे. डॉ. सावंत यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त गतवर्षी 'आचार्य' हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला आहे.

'वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती' हा ग्रंथ औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने प्रकाशित केला असून एका वर्षात त्याची पहिली आवृत्ती संपली आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा हा पुरस्कार डॉ. सुरेश सावंत यांना पुणे येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर आणि सहकार्यवाह ॲड. अ. श्री. चाफेकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी