मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाकडून " पदवीदान समारंभ " आयोजित करण्यात आला होता . स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा आपल्या आई - वडिलांना न फसवता मनापासून तयारी करावी . आयुष्याच्या अडथळ्यावर मात करण्याचे कौशल्य केवळ महाविद्यालय देत असते . त्यामुळे पदवीधर विद्यार्थी हा ज्ञानाबरोबर चारित्र्य सांभाळून समाजात आचरण करणे अतिशय आवश्यक आहे असे विचार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रो.डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी प्रतिपादित केले .
या पदवीदान समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे , प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रो.डॉ. मल्लिकार्जुन करजगी , विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रो. डॉ. सूर्यप्रकाश जाधव , मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय थोरात व्यासपीठावर परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ.ए.एन.गित्ते , मराठी विभाग प्रमुख प्रा.सी. बी. साखरे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. दिलीप आहेर , प्रा.डॉ.विजय वारकड , प्रा.डॉ. प्रसाद जोशी , प्रा.डॉ. मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. ए.एन.गित्ते यांनी केले . बी.ए. आणि बी.काँम.शाखेतील एकुण ६५ इतके विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या समारंभात पदवी प्राप्त केले .
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर विद्यापीठ गीत प्रा.डॉ. प्रसाद जोशी व त्यांचा संच यांनी गायले . मान्यवरांच्या यथोचित सत्कार समारंभानंतर , पत्रकार , पालक यांचा सत्कार करण्यात आला . मुख्याधिकारी धनंजय थोरात यांनी आपल्या भाषणात सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . या महाविद्यालयाचा तालुक्यातील समाजाच्या विकासात खूप मोलाचा वाटा आहे . विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करणारे एकमेव महाविद्यालय आहे . कुशल नेतृत्व आणि सक्षम मनुष्यबळ याठिकाणी आहे . विद्यार्थी यशवंत होऊन समाजाची सेवा करावी असे विचार व्यक्त केले .संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे कौतुक करत राष्ट्रीय सेवा योजनेतूनच असे कुशल प्रशासक तयार होत असतात असा विश्वास व्यक्त केले . स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा आपल्या आई - वडिलांना न फसवता मनापासून तयारी करावी .
आयुष्याच्या अडथळ्यावर मात करण्याचे कौशल्य केवळ महाविद्यालय देत असते . त्यामुळे पदवीधर विद्यार्थी हा ज्ञानाबरोबर चारित्र्य सांभाळून समाजात आचरण करणे अतिशय आवश्यक आहे . जीवनातील प्रसंग अधिक आनंदी निर्माण करण्यासाठी ज्ञान आणि चारित्र्य महत्वाचे आहे . आपण सर्वजण हे कलाकाराच्या भूमिकेत पृथ्वीतलावर आलेले पाहुणे आहोत . आयुष्यातील अडथळ्यांना पार करत यशस्वी झालात तरच उद्याचा सूर्य हा सुखाचा प्रकाश घेऊन येईल . याप्रसंगी सरदार वल्लभाई पटेल यांची गोष्ट सांगितली . भारतीय समाज हा सुंदर आयुष्य जगण्याच्या अगोदर मरणाचाच विचार करत जगत असतो . यापेक्षा आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण आनंदी होऊन जगत रहावे असे विचार व्यक्त केले .
दूसरे प्रमुख पाहुणे संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांनी आपल्या मराठी भाषेच्या प्रभुत्वाचा परिचय देत अतिशय समर्पक विचार प्रकट केले . कवितेच्या अनेक ओळींचा संदर्भ देत महामानवांच्या त्याग , परिश्रम , मेहनत आणि सामाजिक कर्तव्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले . महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर उद्याच्या भारताचे भवितव्य अवलंबून आहे .
महाविद्यालयाच्या यशस्वी पन्नास वर्षाच्या वाटचालीस शुभेच्छा देत समाजात महाविद्यालयाविषयी असणारा दृढविश्वास यावेळी बोलून दाखविले. तरुणांमध्ये तेजस्विता , तपस्विता आणि त्यागमयता असणे आवश्यक आहे . राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे वेदना आणि संवेदना यांची शिकवण देणारे विभाग आहे . साधनेच्या वेळी आलेली वेदना ही यशस्वी झाल्यानंतर विसरता येते . राष्ट्रीय सेवा योजना हे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी शिकवते . वेदनेचे औषध संवेदनेतून सापडत असते . तरुणांनी राष्ट्र उभारणीचे कार्य पूर्ण क्षमतेने करणे आवश्यक आहे . आई-वडिलांच्या वेदना संवेदना आणि अपार कष्ट हे सदैव विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे विचार प्रकट केले .
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी महाविद्यालयाच्या विकासामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा असतो. जे विद्यार्थी उच्च पदावर जाऊन समाजाची व राष्ट्राची सेवा करीत असतात त्यावेळी आपोआपच महाविद्यालयाचा गौरव होत असतो . आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी हा संघर्षरत असला पाहिजे. आज पदवी घेणारे विद्यार्थी हे समाजाचे व राष्ट्राचे काही देणे लागतात याची जाणीव सदैव उराशी बाळगून कार्य करीत राहावे असे विचार व्यक्त केले . विद्यापीठाकडून पदवीदान समारंभासाठी आखणी करून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग , विविध समितीचे प्रमुख आणि सदस्य , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले . बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक , पत्रकार , पदवीधारक विद्यार्थी व विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
