पोळा हा बैलांचा उत्सव. शेतकर्यांना उत्साहीत करणारा असा हा उत्सव आहे. अनंत कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणार्या शेतकर्याला आनंदी पहाणे कोणाला आवडणार नाही.
तिथी- पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा उत्सव श्रावण मासातील अमावास्येला साजरा केला जातो.
उद्देश - 1. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते.
2. हा उत्सव साजरा केल्याने शेतात भरपूर धान्य पिकते आणि गोधन वाढते, असे समजले जाते.
3. ‘पोळ्याच्या दिवशी जे प्राणीमात्र आपल्या कष्टाने मानवाच्या जीवनाला आधारभूत झालेले आहेत, त्यांची पूजा आणि स्मरण केले जाते.
उत्सव साजरा करण्याची पद्धत- शेतकर्यांमध्ये या उत्सवाला फार महत्त्व आहे. पेरण्या झाल्यानंतर शेतीच्या कामांतून बैल रिकामे झाले म्हणजे त्यांना न्हाऊ-माखू घालायचे, आरती ओवाळायची, नैवेद्य दाखवायचा आणि मग दुपारी रंगवून आणि शृंगारून गावातून मिरवत न्यायचे, असा हा उत्सव सोहळा असतो.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180
