६ सप्टेंबरपासून जि.प. नांदेडसमोर करणार अमरण उपेाषण
नांदेड। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील संगणक ऑपरेटरच्या मनमानीला कंटाळून येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संगणक ऑपरेटरला निलंबीत करण्याच्या मागणीसाठी दि. ६ सप्टेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालय नांदेडसमोर ग्रामस्थ अमरण उपोषणास प्रारंभ करणार असल्याचे एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. नांदेड यांना कळविले आहे.
याबाबत अधिक असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथे सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात खर्या गरजवंत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. परंतु पोटा बु. ग्रामपंचायत येथील संगणक ऑपरेटर मुंजाजी दगडू जळपते यांनी गावातील श्रीमंत आणि शेतीबाडी असणार्या धनाढ्य लोकांकडून पैसे घेऊन त्यांची नावे घरकुल यादीमध्ये समाविष्ट करुन खर्या व गरजवंत लाभार्थ्यांवर अन्याय केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खर्या व गरजवंत लाभार्थ्यांनी घरकुल यादीमध्ये नाव का आले नाही अशी विचारणा संगणक ऑपरेटरला केली असता दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या संगणक ऑपरेटर जळपते यांनी अरेरावीची भाषा वापरुन गावातील अनेक नागरिकांना अपमानीत करुन खर्या लाभार्थ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर तक्रार करण्यात आली असताना सुद्धा त्यांनी यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने पोटा बु. ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संगणक ऑपरेटर मुंजाजी जळपते याच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी व त्यांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांच्या चौकशीसाठी दि. ६ सप्टेंबरपासून पोटा बु. येथील ग्रामस्थ लोकशाही मार्गाने नांदेड जि.प. समोर अमरण उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार हिमायतनगर यांच्यासह अनेकांना दिले आहे. या निवेदनावर नागोराव मेंडेवाड, अविनाश कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.
