मुखेड। बाऱ्हाळी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाऱ्हाळी ते देगलूर महामार्गावरील नदीला पूर आला आणि ४ ऑगस्ट रोजी रात्री या पुरात उतरलेली जीप चालकासह वाहून गेली. परंतु महत्प्रयासाने चालकाला वाचवण्यात यश आले.मुखेड तालुक्यातील एकमेव असलेला कुंद्राळा मध्यम प्रकल्प यावर्षी जुलैमध्येच पूर्ण क्षमतेने भरला आहे. थोडा जरी पाऊस पडला की,या धरणातून वाहणाऱ्या नदीला पूर येत आहे. या नदीवर लहान पूल असल्याने वारंवार बाऱ्हाळी ते देगलूर राज्य महामार्ग बंद होतो. या रस्त्यावरील पुलावर पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे गेल्या वर्षी एक युवक वाहुन गेल्यामुळे त्याचा मृत्यु झाला होता. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि रात्री ८.३० च्या दरम्यान या पुलावरुन जाणाऱ्या जीप चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि जीप नदीच्या प्रवाहात पडून वाहून गेली.
या काळयापिवळया जीपचा क्रमांक एमएच २४ सी ३९४२ आहे. चालकाचे नाव अशोक तुळशीराम राठोड (३४) रा.कमला तांडा जिरगा आहे. जीप नदीत पडल्यानंतर वाहून जाताना थोड्या अंतरावर अडकली. तेव्हा चालकाने जीपच्या टपावर जावून आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर चालकाला गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास सुखरुप बाहेर काढले. यावेळी मुखेडचे तहसीलदार काशीनाथ पाटील,मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.