नांदेड| वारंवार आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाचा एका आईने काळजावर दगड ठेऊन दोन भाडेकरूंच्या माध्यमातून खून केल्याची घटना उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारड शिवारातील खुनाच्या प्रकरणाचा उलगडा केला असून, आईसह इतर दोन आरोपींना अटक केली आहे.
१४ ऑगस्ट रोजी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा खून झाला होता. याप्रकरणी बारड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाला मृताची आई शोभा त्र्यंबकराव श्रीमंगले (५५) यांनी इतर दोन व्यक्तींना सोबत घेऊन हा खून केल्याची माहिती मिळाली.
नांदेडमधील गीतानगर येथून शोभाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘मुलगा सुशील हा नेहमी आम्हाला मारहाण करून त्रास देत होता’ असा जबाब शोभा यांनी दिला. त्यांनी भाडेकरू राजेश गौतम पाटील (२७) व त्याचा मित्र विशाल देवराव भगत (२७) यांना सुशीलचा खून करण्यास सांगितले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या संबंधाने विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा खून त्यांनी शोभा श्रीमंगले यांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले. तिन्ही आरोपींना बारड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.