शाळेला जाणारा रस्ता बंद झाल्यामुळे ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन
हिमायतनगर। तालुक्यातील विरसणी येथील शाळेला जाण्याचा रस्ता हा गायरान जमिनीतून असुन, या जमिनीवर गावातील व्यक्तीने अतिक्रमण केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीचा रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाता ऐत नाही म्हणून सदरील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील विरसणी येथील शाळेला जाण्यासाठी गायरान जमिनीतून रस्ता आहे. सदरील गायरान जागेवर गावातील प्रकाश नारायण महाजन यांनी अतिक्रमण करून पुर्ण रस्त्यावर कब्जा केला असल्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे.
गावातील विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने अतिक्रमण केलेल्या व्यक्तीस गावातील नागरीकांनी अतिक्रमण हटवून शाळेला रस्ता करून देण्यासाठी सांगितले. परंतु सदरील अतिक्रमण धारकाकडून अरेरावीची भाषा करून शाळेला रस्ता देणार नाही अशी धमकी देत असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी गुरूवारी हिमायतनगर तहसीलदार यांना दिले आहे.
सदरील रस्ता हा शासनाच्या गायरान जमिनीतून पुर्वीपासून असुन, या रस्त्यावरून गावातील विद्यार्थी शाळेला ये जा करीत असतात. परंतु गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावर अतिक्रमण केले असल्यामुळे शाळेला जाण्यासाठी रस्ता पुर्णपणे बंद झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ताच नाही. यामुळे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार ,पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदरील रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून शाळेला रस्ता करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर बापुराव शिंदे, गजानन देशमुख, पंजाब मोशेवाड, मारोती सुर्यवंशी, तुकाराम भेलोंडे, अमोल वारकड, कैलास वाढोणकर, संदीप येणेकर, विनायक पाळजकर, अनिल गायकवाड, परमेश्वर कांबळे, किशन देवसरकर, अमोल पतंगे, प्रकाश कमटेवाड, माधव झुकरे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.