नांदेड। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर आणि प्रा.सौ. विद्या शेंदारकर यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्यक्तिमत्व विकासतज्ज्ञ डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी संपादित केलेल्या ’साफल्य’ ह्या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. संपादन कार्याबद्दल डॉ. हनुमंत भोपाळे यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट देऊन करण्यात आला. हा कार्यक्रम नांदेडच्या कुसुम सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कुलगुरू डॉ.उध्दव भोसले, आमदार अमरभाऊ राजूरकर, माजी आमदार डी.पी. सावंत, महापौर जयश्रीताई पावडे, किशोरअप्पा पाटील, गुलाबराव भोयर, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव उदयराव निंबाळकर, खजिनदार प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, प्रा.विद्याताई शेंदारकर, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मीनलताई खतगावकर, नरेंद्र चव्हाण, सनदी अधिकारी तथा सिनेअभिनेते अनिल मोरे, डॉ जगदीश कदम आदींची उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात अशोकराव चव्हाण म्हणाले, डॉ हनुमंत भोपाळे यांनी साफल्य हा गौरव ग्रंथ मेहनत घेऊन उत्कृष्ट असा तयार केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विश्वाधर देशमुख यांनी केले, तर आभार डॉ. प्रकाश शेंदारकर यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक, प्राध्यापक, साहित्यिक आणि श्रोते उपस्थित होते.