जिल्हा प्रकल्प अधिकार्याकडे केली काढून टाकण्याची मागणी
नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटरच्या भ्रष्ट वृत्तीला व मनमानी कारभाराला ग्रामस्थ वैतागले असून त्यास काढून टाकण्याची मागणी जिल्हा प्रकल्प अधिकार्यांकडे व वरिष्ठांकडे एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी आज दि. १ ऑगस्ट रोजी केली आहे.
पोटा (बु.) येथील अनेक गरजवंत, गरीब नागरिकांनी सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षात घरकुल योजनेकरीता ऑनलाईन अर्ज केले होते. परंतु येथील ग्रामपंचायतीचे संगणक ऑपरेटर मुंजाजी दगडू जळपते यांनी गावातील धनदांडगे व शेतीबाडी असणार्या लोकांकडून ५ हजार रुपये घेऊन त्यांची नावे घरकुल यादीत समाविष्ट केली व खर्या गरजवंत लाभार्थ्यांची नावे वगळून घरकुल योजनेच्या यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला आहे. कोणत्याही कामासाठी लोकांकडून पैसे उकळून हा ऑपरेटर दिवसभर दारुच्या नशेत तर्रर्र राहून कामासाठी कोणी ग्रामस्थ गेले तर त्यांना अरेरावीची भाषा बोलून अपमानीत करत असल्याचे निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे. तसेच जॉबकार्ड काढण्याकरीता सुद्धा संगणक चालक जळपते हा पैसे घेऊनच काम करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
याबाबत जिल्हा प्रकल्प अधिकार्यांनी ग्रामपंचायत कार्यालय पोटा (बु.) येथील प्रसिद्ध करण्यात आलेली घरकुल यादी तपासून खर्या गरजवंत, गोरगरीब नागरिकांना यादीमध्ये समाविष्ट करावे व संगणक चालक मुंजाजी जळपते यांना या पदावरुन काढून त्यांच्या ठिकाणी दुसर्या गरजवंत, होतकरु, सक्षम सुशिक्षीत बेरोजगार युवकाची निवड करावी अशी मागणी पोटा बु. च्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रकल्प अधिकार्यांसह जिल्हाधिकारी, नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकार्यांकडे केली आहे. याबाबत जिल्हा प्रकल्प अधिकारी काय निर्णय घेतात याकडे हिमायतनगर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.