अशा 10 देशभक्ती गीताने जिल्ह्यातील शाळा दुमदुमल्या
जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमात 6 लाख 50 हजार विद्यार्थ्यांंचा सहभाग
नांदेड| आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रभक्तीपर 10 गीतांच्या समूहगान कार्यक्रमात जिल्ह्यातील 3 हजार 739 शाळांमधील 6 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.
अत्यंत बहारदार झालेल्या कार्यक्रमात नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शंकरराव हंबर्डे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गट विकास अधिकारी मुक्कावार, गट शिक्षणाधिकारी बनसोडे, सरपंच संध्याताई देशमुख, उपसरपंच अर्चना हंबर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव हंबर्डे, आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या हर घर तिरंगा जनजागृती पोस्टरचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची तयारी गेल्या आठवड्याभरापासून चालू होती. यासाठी जिल्हास्तरीय बैठका, तालुका पातळीवर बैठका, ग्रामसभा आदींचे आयोजन गाव स्तरावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या समूहगानाची तयारी शाळांमधून करून घेण्यात आली. आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यास विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्तीपर गीतांचा समावेश होता. प्रत्येक गीतातील एक-एक कडवे यावेळी समूह स्वरात गाण्यात आले. या देशभक्तीपर समूह गायनाने संबंध परिसर दुमदुमला होता.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त नांदेड जिल्ह्यात घेण्यात असलेले विविध कार्यक्रम आणि देशभक्तीपर समूह गान कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास सचिव राजेश कुमार, शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे सचिव रंजीतसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. शुभेच्छा संदेशाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी वाचन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवली. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, बंडू अमदुरकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे, मुख्याध्यापक, प्रलोभ कुलकर्णी, मुख्याध्यापक खदीर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष विजयश्री हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, संतोष बारसे, राजू हंबर्डे, कमलाकर हटकर, शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यासाठी सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुयोग्य नियोजन करुन देशभक्तीपर समूहगान कार्यक्रम यशस्वी केला.