नांदेड। ‘वारणेच्या खोऱ्यापासून रशियातील मॉस्को पर्यंत ज्यांच्या आयुष्याचा प्रवास झाला. अण्णा भाऊ साठे हे अलौकिक प्रतिभेचे धनी होते. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले नसताना त्यांना मराठी साहित्य विश्वाला दिशा देण्याचे काम केले. अण्णा भाऊ साठे ज्या काळात लिहीत होते. तो काळ स्वातंत्र्याच्या चळवळीचा, जागतिक महायुद्धाचा काळ होता.
मराठी साहित्यात त्यावेळी फडके, खांडेकरांचे वर्चस्व होते. अशा काळात अण्णा भाऊ साठे यांनी वास्तववादी लेखन करून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्याची नव्या दृष्टिकोनातून चिकित्सा व्हायला हवी’, असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती व्याख्यानाच्या निमित्ताने ‘परिवर्तनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनावादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता, डॉ. अजय टेंगसे, सल्लागार समिती सदस्य, श्री. काळबा हनवते, अध्यासन केंद्राचे समन्वयक, डॉ. पी. विठ्ठल उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अंभुरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे प्रतिभावंत लेखक असूनही त्यांची मराठी साहित्य विश्वाने मोठी उपेक्षा केली. कारण अण्णा भाऊ साठे हे कधीही सत्ताधाऱ्यांच्या वळचनींना गेले नाहीत. वास्तवाला कल्पनेचा आधार देऊन त्यांनी मराठी साहित्यात परिवर्तन घडविले. उपेक्षित लोकांचा आणि स्त्रियांचा त्यांनी सन्मान केला. सामान्य माणसाच्या भुकेचे प्रश्न त्यांनी कथेतून मांडले. बुद्धाचं कारुण्य त्यांच्या लेखणीतून पाझरतांना दिसतं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपर कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे म्हणाले, ‘सामाजिक अन्यायाच्या विरोधात आसूड ओढणारे अण्णा भाऊ साठे श्रेष्ठ लेखक होते. त्यांचे कर्तुत्व आपल्याला विसरता येणार नाही’. यावेळी माजी कुलसचिव, डॉ. रमजान मुलानी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, यांच्यासह प्रा. डॉ. प्रमोद लोणारकर, प्रा. डॉ. बाबुराव जाधव, प्रा. डॉ. शंकर जाधव, डॉ. हर्षवर्धन दवणे, डॉ. नितिन गायकवाड, विजयकुमार अचलखांब, जालिंदर गायकवाड, संदीप एडके, प्रदीप बिडला, डॉ. प्रविणकुमार सावंत, गोपाळ वाघमारे, संजय हंबर्डे, बालाजी शिंदे, ज्येाति चित्तारे, जया बुकतरे, मनोज टाक, हरीदास जाधव आदींची उपस्थिती होती.