नागरिकांना त्रास न होता रस्त्यांची विकास कामे वेळेत पूर्ण करा - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण -NNL


नांदेड, अनिल मादसवार।
नांदेड वाघाळा महानगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नांदेड शहर परिसरात सुरु असलेल्या रस्त्यांची कामे करतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कामांचा दर्जा उत्कृष्ट राहावा आणि ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत अशा महत्वपूर्ण सूचना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेली रस्त्यांची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या विविध योजनेतील कामांचा आढावा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतला. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.जयश्री पावडे, सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे पदाधिकारी ॲड.निलेश पावडे, नगरसेवक बालाजीराव जाधव, आयुक्त डॉ.सुनिल लहाने, सहाय्यक आयुक्त गिरीष कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, संबंधीत कंत्राटदार यांची उपस्थिती होती.

आजच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरातील विविध योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. मुलभूत सोयीसुविधा योजने अंतर्गतच्या विविध कामांचा विद्यमान परिस्थिती काय आहे, कोणती कामे पूर्ण झाली आहेत, कोणत्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही आणि सुरु असलेल्या कामांच्या अडीअडचणींबाबत अधिकारी आणि संबंधीत कंत्राटदार यांच्याशी संवाद साधला. विविध योजनेतील प्रत्येक रस्त्याच्या कामाची सविस्तर माहिती यावेळी बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली. ज्या ठिकाणी कांही समस्या असतील त्या समस्या तातडीने सोडविण्याच्या महत्वपूर्ण सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या.

रस्त्याची कामे सुरु असून त्यामुळे नागरिकांना कांही ठिकाणी त्रास होत आहे. याची काळजी संबंधीतांनी घेणे आवश्‍यक आहे. रस्त्याच्या एका बजूचे काम सुरु करुन दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत कशी होईल याची काळजी घ्यावी. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्याची कामे रात्रीच्या वेळी सुरु करावीत आणि सकाळपर्यंत ही कामे संपविल्यास नागरिकांना त्रास होणार नाही. यासाठी पोलिस प्रशासन, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपसात समन्वय साधून ही कामे ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत. शहरातील काळा पुल येथील पुलाच्या बांधकामाची माहिती घेवून पुलाचे बांधकाम व त्याची उंची योग्य ठरविण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक कामाचे परिक्षण कॉलिटी कंट्रोलमार्फत करण्यात यावे, कामाचा दर्जा उत्कृष्ट राहावा याची दक्षता संबंधीतांनी घ्यावी. शहरातील सुरु असलेल्या विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी माझी असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत त्या रस्त्यांवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करणे, व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॉफिक वॉर्डनची नियुक्ती करावी आणि नगरसेवक, आमदार महोदय, पोलिस प्रशासन व महापालिका यांनी वेळोवेळी समन्वय राखून ही कामे कशी सुरळीत होतील याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांची कामे सुरु असतांनाच तेथील कामांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याकरिता आमदार, नगरसेवक यांचेही सहकार्य घ्यावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, सभापती किशोर स्वामी, ॲड.निलेश पावडे, नगरसेवक बालाजीराव जाधव यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

विकास कामांबाबात समाधानी - अशोकराव चव्हाण
विविध रस्त्यांच्या विकास कामांच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, नांदेड शहरातील जी विकास कामे सुरु आहेत त्याबाबत समाधानी आहे. 40 टक्क्यांच्या जवळपास कामे झाली असून सर्व कामे प्रगतीपथकावर आहेत. महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत मी निमंत्रीत म्हणून आलो आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.  राज्यातील सध्याच्या सरकारमुळे काही कामे रेंगाळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी