सरकारने शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी -जयंत पाटील
नांदेड। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेले आहेत. नांदेड जिल्हा, वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतीचे पंचनामे करून शेतकर्यांना सरकारने त्वरीत मदत करावी, प्रशासनाने, सरकारने यासंदर्भात तात्काळ पावले उचलून मदत करावी असे राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि. 14 जुलै रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर होते. या दौर्यानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीची माहिती दिली. तसेच नांदेड तालुक्यातील झालेल्या शेतीच्या हानीसंदर्भात तालुक्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मोहम्मद खान पठाण, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, राष्ट्रवादी युवक कांँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, नांदेड शहर राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या दौर्यात जयंत पाटील यांनी निळा, आलेगाव, एकदरा या गावाची पाहणी केली. शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याची बाब त्यांनी पाहिली. यावेळी पाटील म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. नांदेड जिल्ह्यातील वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी गावात शिरले. संपुर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकर्यांना दिलासा द्यावा तसेच घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून पुरस्थितीचे संकट राज्यात लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मंत्री मंडळाचा विस्तार करून लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशीही त्यांनी मागणी केली.