नांदेड। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी व त्यांची यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे.
मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, अभियंता बागानगरे, उप अभियंता शास्त्री, विस्तार अधिकारी के.एच. गायकवाड, सरपंच, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
शिखाचीवाडी येथील मालगुजरी तलाव शंभर टक्के भरले असून हा तलाव फुटण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. ही माहिती मिळताच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन मालगुजारी तलावाची पाहणी केली. यावेळी जेसीबीद्वारे सांडव्यातून पाणी बाजूला काढण्यात आले. त्यामुळे येथील स्थिती नियंत्रणात आली आहे. ग्रामसेवक व गावकरी यांनी तलावाकडे लक्ष ठेवून राहावे. भविष्यात काही परिस्थिती निर्माण झाली तर तात्काळ जिल्हा क्षप्रशासनाला कळवावे अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती, घरांची पडझड, नद्या नाद्यांना आलेला पुर ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेती सर्व यंत्रणा सज्ज झाली असून गावस्तरीय कर्मचारी व अधिकारी आपत्कालीन परिस्थिती जाणून घेत आहेत. गाव स्तरावर आपत्कालीन समिती स्थापन करून आवश्यक असल्यास तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नदीकाठच्या गावातील ग्रामसेवकांनी गावात स्थळ ठोकून राहावे, प्रत्येक गावात ब्लिचिंग पावडरचा नवीन साठा आणून ठेवावा, संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता ज्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, आरोग्य व पशुसंवर्धन यंत्रणांनी मानवाच्या व पशुंच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच गावात संडास-उलट्याची साथ येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, शाळा व अंगणवाडीची कुठलीही पडझड झाल्यास तात्काळ जिल्हा परिषदेला कळवावे अशा सूचनाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.