केवळ एका आठवड्यात ११८१ होमगार्ड यांनी उघडले 'एचडीएफसी' बँकेत खाते
नांदेड। राज्यातील सर्व होमगार्ड यांना विम्याचे संरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घेतला आहे. त्याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील १५९४ होमगार्ड यांना मिळणार आहे.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून धाकटया भावासारखे काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना पोलिसांप्रमाणे विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे महासमादेशक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील होमगार्ड यांना विम्याचे संरक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यासाठी एचडीएफसी बँकेने पुढाकार घेतला आहे.
यातील होमगार्डचे बँक खाते एचडीएफसी बँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली आहे. सदरील खाते शुन्य बॅलन्स या धर्तीवर वेतनी खाते राहणार आहे. 50 लाख व अतिरिक्त 20 लाखांसह वैयक्तिक अपघात विमा, 50 लाखापर्यंत स्थायी अपघात विकलांगता विमा, 50 लाखापर्यंत स्थायी अंशीक अपघाती विकलांगता विमा, चार लाखांचा जीवन विमा, खातेदाराचे निधन झाल्यास अवलंबित पाल्यांना विनामूल्य चार लाखांपर्यंत शैक्षणिक लाभ, रुग्णालयात अंतर रुग्ण झाल्यास पंधरा दिवसांपर्यंत 15 हजारांची आर्थिक मदत, कर्ज सुविधा असा लाभ या खात्यामुळे मिळणार आहे. तसेच कुटुंबातील इतर पाच सदस्यांचे झिरो बॅलन्स खाते याच बँकेत उघडता येणार आहे.
नांदेड होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील होमगार्डचे खाते एचडीएफसी बँकेत उघडण्याची प्रक्रिया राबविण्यास आठवडयापुर्वी सुरुवात झाली. केवळ एका आठवड्यात १५९४ पैकी ११८१ होमगार्ड यांनी खाते नोंदणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे सक्षम कागद पत्रांसह खाते नोंदणी केल्यास लगेच बँक पासबुक, चेक बुक, एटीएम, कार्ड नेट बँकिंग सुविधा देण्यात येत आहेत.
जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखालीजिल्ह्यातील उर्वरित इच्छुक होमगार्ड यांचे खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू असून या कामे एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ मॅनेजर शिवानी हरचेकर, सेल्स ऑफिसर तनवीर सय्यद, शुभी शर्मा, अविनाश यादव, समशेर अहमद, होमगार्डचे प्रशासिक अधिकारी भगवान शेट्टे, केंद्रनायक अरुण परिहार, मुख्य लिपिक वैशाली डावरे, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे (नांदेड), बालाजी डफडे (कंधार), राजू श्रीरामवार (भोकर), खंडू खंडेराव (बिलोली), दीपक काकडे (हदगाव), अशोक पैलावार (देगलूर), कैलास पाटील (मुखेड), संजय कोंडापलकुलवार (किनवट), पलटन नायक बी.जी.शेख, स.बलबिरसिंघ, बळवंत अटकोरे आदी परिश्रम घेत आहेत.