किनवट मध्ये संततधार पावसामुळे पैनगंगा नदी काठोकाठ -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी।
तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पुरामुळे शहरातील गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, गंगानगर, मोमीनपुरा, नाला गड्डा, मामीडगुडा, अयप्पा नगर या शहराच्या सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले असून किनवट येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला आहे.  

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी नाल्याजवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे, पिण्याचेशुद्ध पाणी व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील शेतीच्या पिकांची पाहणी केली. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई शासनस्तरावर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. माहूर तालुक्यातील धनोडा जवळील पैनगंगा नदीच्या पुलाच्या पाण्याची पातळी वाढली असून आसपासच्या शेतात पाणी घुसले असल्याने आ.केराम यांनी पुराची पाहणी करून प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांचेसमवेत प्रशासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीच्या पुलावरचे पाणी वाढल्याने मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

शहरातील पोलीस स्टेशन हे निजामकालीन असून सततच्या मुसळधार पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचले असून पोलीस स्टेशनचे छत कधी कोसळेल याचा काही नेम नाही. यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. झालेल्या पावसामुळे येणा­या जाणा­यांना बसण्यासाठी जागाच नाही. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी असलेले संगणक कक्ष छतातून पाणी पडत असल्याने बंद आहे. 

पोलीस स्टेशनच्या छतावर तात्पुरती ताडपत्री टाकण्यात आली असूनही छतातून पाणी गळत आहे व शॉर्टसर्किट च्या घटना घडत आहेत. वरीष्ठांनी याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अश्या परिस्थितीतही पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके व पोलीस उपनिरिक्षक पवार, घुले व पोलीस कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 

सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसिलदार तथा मुख्याधिकारी मृणाल जाधव, उपनगराध्यक्ष व्यंकट नेमानीवार, नगरसेवक श्रिनिवास नेमानिवार, साजिद खान,अभय महाजन ह्यांच्यासह नगरसेवकांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी