हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या भरवश्यावर धूळपेरणी केली, तर अनेकांनी मृगनक्षत्रानंतर झालेल्या पावसावर पेरणी आणि कपाशीची लागवड आटोपली. सुरुवातीला पावसाने उघडीप दिली त्यानंतर गेल्या तीन दिवसापासून झालेल्या सततच्या पावसामुळे पेरणी केलीली पिके उगवण्यापूर्वी जमिनीत दबून गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, यामुळे बळीराजा नुकसानीत आला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची पाहणी करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार समितीचे तालुकाध्यक्ष डॉ.अब्दुल गफ्फार कार्लेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कोरोनानंतर नव्या जोमाने कामाला लागला आहे. यंदा वेळेवर पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसावर धूळ पेरणी केली होती. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसाच्या भरवश्यावर पेरण्या उरकल्या. मात्र वरून राजा रुसल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची धाकुढूक वाढली, आणि पावसाची उघडझाप यामुळे शेतकरी आर्थिक सन्कटात सापाला आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या ३ तारखेपासून पावसाला सुरुवात झाली. परंतु सतत तीन दिवस झालेल्या आदळनी पडलेल्या पावसामुळे जमिनीतील बियाणे दबून गेल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. परिणामी शेतकरी पूर्णतः हतबल झाला असून, दुबार पेरणीसाठी खर्च कुठून करायचा या विवंचनेने ग्रासले आहे.
ज्यांची पिके वाऱ्यावर डोलत आहेत, अश्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जमून आणि नाल्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पिकासह खरडून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. या विदारक परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे. केवळ मोफत बियाणे देऊन चालणार नाही तर सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी नुकसानीप्रमाणे आर्थिक मदत देऊन या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार समितीचे तालुकाध्यक्ष डॉ.अब्दुल गफ्फार कार्लेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे देण्यात आली आहेत. या निवेदनावर सोपान बोम्पीलवार, गणपत मिराशे, कमलबाई कदम, यशोदाबाई बालाजी, आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.