संघनायक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन ; खुरगावला पौर्णिमोत्सव, धम्मदेसना भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न
नांदेड| मानवाने कुशल कर्म करुन पुण्य अर्जित केले पाहिजे. तसेच दान कर्म हे मनुष्याला बुद्धत्वाच्या अवस्थेत नेण्यासाठी सहाय्यक ठरते, असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते. बोधीपुजा, सूत्तपठण, त्रिरत्न वंदना, धम्मदेसना, व्याख्यान, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धम्मदेसना देतांना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, मनुष्याने शिल पालन करुन निर्वाणसुखाकडे वाटचाल करावी. बोधीसत्व हे बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी जीवनात कितीही लाभ-हानी, यश-अपयश, निंदा-प्रशंसा, सुख- दुःखाची कितीही संकटे आली तरी लोककल्याणापासून, प्राणीमात्रांचे कल्याण करण्यापासून दूर जात नाहीत. भलेही त्यांच्या जीवनात काही काळ निराशा येऊ शकते. त्यांचा उत्साह मात्र परत वृद्धिंगत होत असतो. ते सर्वच जगाच्या कल्याणासाठी आपल्या प्रियजनांचा त्याग करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
यावेळी बोलतांना माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले म्हणाले की, श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १८ फुटांची संगमरवरी दगडाची अखंड पाषाणात कोरलेली बुध्दमूर्ती समाजाच्या आर्थिक दानांतून तयार झाली आहे. या मुर्तीला प्रतिष्ठापित करण्यासाठी तेहतीस बाय तेहतीसचे तेही अठरा फुटांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यावर ही मुर्ती बसवायची आहे. हा खर्च अंदाजे बावीस लक्ष रुपये इतका होण्याची शक्यता आहे. तरी श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यांनी केले. यावेळी अभियंता भारत कानिंदे, डी. बी. ढवळे, प्रेमला ढवळे, प्रा. विनायक लोणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव इंगोले यांनी केले तर आभार प्रा. एस. एच. हिंगोले यांनी मानले.
शहरातील हर्ष नगर येथील पंचशील महिला मंडळाच्या वतीने भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माया पाईकराव, स्मीता रोकडे, प्रफुल्लता वाठोरे, शांताबाई जोंधळे, शांताबाई सोनकांबळे, सुनिता वाघमारे, अंजनाबाई बहात्तरे, सुनंदा किन्हाळकर, चौतरा सोनसळे, वैशाली सोनसळे, शांता नगारे, मंदा पाटील, वागरे ताई, सुशिला हिंगोले, सत्वशिला थोरात, रेखा नाथभजन, सुनंदा सोनकांबळे यांनी पुढाकार घेतला होता.