नांदेड| आपल्या स्वतःच्या शेतातील सागवानाची झाडे तोडण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास लाच मागणी केली. संबंधित शेतकऱ्याकडून अगोदर ५ हजारांची लाच घेतली, त्यानंतरही १३ हजार लाचेची मागणी होत असल्याने शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर लाच घेताना वन सर्वेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एका शेतकरी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.११ में २०२२ रोजी तक्रार दिली होती. त्या शेतकऱ्यास आपल्या शेतातील सागवानाची झाडे तोडायची होती. सर्वेक्षण करून आणि झाडे तोडल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी नांदेड विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्वेक्षक गणेश प्रकाशराव मज्जनवार वय ३५ याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यापूर्वी सर्वेक्षक गणेशने शेतकऱ्याकडून ५ हजार रुपये या परवानगीसाठी स्वीकारले होते.
मात्र पुन्हा लाच मागणी होत असल्याने लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्यावरून दि.०१ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लोकांनी लाच मागणीची पडताळणीत केली असता ही बाब निष्पन्न झाली. दरम्यान, शिल्लक पाच हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार गेला असता तुमचे काम वाढले आहे. म्हणून १३ हजार रुपयांची मागणी वन सर्वेक्षक मज्जनवार याने केली. आणि ती पंचासमक्ष स्वीकारली, यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर गणेशाला अटक केली आहे.
हि सापळा कार्यवाही डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड. पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांच्या सूचनेवरून सहाय्यक सापळा अधिकारी अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, अरविंद हिंगोले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांनी सापळा कारवाई पथक पोना एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, गणेश तालकोकुलवार, ईश्वर जाधव, चापोना मारोती सोनटक्के, ला.प्र.वि.युनिट नांदेड यांनी केली आहे.
या कार्यवाहीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले कि, नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास कार्यालय दुरध्वनी - 02262 253512 राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल नंबर - 7350197197 @ टोल फ्रि क्रं. 1064 तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.