नांदेड| नांदेडमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन काशीनाथ स्वामी वय ८२ वर्ष यांनी बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गेल्या काही दिवसापासून ते श्वसनाच्या आजारामुळे त्रस्त असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, हि घटना रविवारी गटारीला घडली आहे.
शहरातील भाग्यनगर कमानीजवळील एका इमारतीत राहणारे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन हे रविवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये गेले होते. तेथेच त्यांनी स्वत:कडे असलेल्या बंदुकीने हनुवटीखाली गोळी झाडून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. या ठिकाणी पोलिसांना सुसाइड नोट लिहिलेली सापडली. त्यात श्वसनाच्या आजारामुळे आत्महत्या करत आहे, कुणाबद्दल माझी काही तक्रार नाही, असे नमूद केले आहे.
मल्लिकार्जुन स्वामी हे नांदेड-वाघाळा शहर महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील होत. स्वामी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गाव आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाग्यनगर पोलिस ठाण्यात याबाबत उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.