गुरूंनी एखाद्या साधकास गुरुमंत्र दिलेला असतो. या गुरुमंत्राद्वारे त्याने त्याची उपासना करायची असते. मात्र काही वेळेस हा मंत्राबद्दल गुप्तता बाळगावी असे म्हटले जाते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. एखाद्या साधकाची आवश्यकता लक्षात घेऊन गुरु त्याला एखादा मंत्र सांगतात, तेव्हा त्यात त्यांची शक्ति असते. तोच मंत्र त्या साधकाने दुसर्याला सांगितला, तर सांगणार्या साधकात शक्ति नसल्याने त्या मंत्राने साधना केली तरी दुसर्याला त्याचा फायदा होत नाही. तसे झाले तर त्या दुसर्याचा व त्याचा अनुभव ऐकून पहिल्या साधकाचा बुद्धिभ्रंश होऊन तो (पहिला साधकही) साधना बंद करण्याचा संभव असतो.
२. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची म्हटली की, तिची आठवण सातत्याने होते. या नियमानुसार मंत्र गुप्त ठेवायचा म्हटले की मंत्रसाधना जास्त होते.
३. प्रत्येकाचा मंत्र निराळा असल्याने एकाचा मंत्र काय आहे, हे दुसर्याला कळल्याने त्याचा त्याला काहीएक फायदा होत नाही.
४. गुरुमंत्र म्हणजे नुसता नामजप नसून मंत्र असल्यास, अयोग्य रीतीने मंत्रोच्चार झाला तर त्यामुळे तो मंत्र म्हणणार्या दुसर्याचे नुकसानही होऊ शकते. (‘अध्यात्मशास्त्र : प्रकरण १० - मंत्रयोग, मुद्दा - उच्चार व महत्त्व’ पहा.)
‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, हा नियम अभ्यासू साधक व गुरुबंधूंशी बोलतांना पाळण्याची गरज नाही. त्यांच्याबरोबर चर्चा करतांना मंत्र किंवा कोणतीही साधना गुप्त ठेवण्याची आवश्यकता नाही; कारण चर्चेतून सर्वांनाच काहीतरी शिकता येते व काही धोकाही नसतो.
रामानुजांना गोष्ठीपूर्णांकडून ‘ॐ नमो नारायणाय’ हा गुरुमंत्र मिळाला. हा मंत्र गुप्त ठेवण्याची गोष्ठीपूर्णांनी त्यांना आज्ञा केली. ‘या मंत्राने मुक्ति मिळते’ असे गुरूंनी सांगितल्यावर ते नजीकच्या एका मंदिराच्या शिखरावर चढून मोठ्याने तो मंत्र म्हणू लागले. अनेकांच्या कानावर तो मंत्र पडू लागला. ही गोष्ट कळल्यावर गोष्ठीपूर्ण अतिशय रागावले व रामानुजांना म्हणाले, ‘‘तू गुर्वाज्ञेचे पालन केले नाहीस. तुला नरकात खितपत पडावे लागेल.’’ यावर रामानुज उत्तरले, ‘‘आपल्या कृपेने हे सर्व स्त्री-पुरुष जर मुक्ति पावणार असतील, तर मी नरकात आनंदाने जायला तयार आहे.’’ हे ऐकून गोष्ठीपूर्ण प्रसन्न होऊन उद्गारले, ‘‘आजपासून विशिष्टाद्वैतवाद हा ‘रामानुजदर्शन’ म्हणून तुझ्या नावाने ओळखला जाईल.’’
गुरु आणि इतर
अ. शिक्षक आणि गुरु : शिक्षक ठरावीक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवतात, तर गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्याथ्र्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्याथ्र्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकवण्यापुरताच मर्यादित असतो.
आ. प्रवचनकार आणि गुरु : ‘पुढील कोष्टकात प्रवचनकारांचे आणि गुरूंचे (संतांचे) बोलणे, यांतील भेद स्पष्ट केला आहे.
इ. भगत आणि गुरु : भगत प्रापंचिक अडचणी दूर करतात, तर गुरूंचा प्रापंचिक अडचणींशी संबंध नसतो. त्यांचा संबंध शिष्याच्या केवळ आध्यात्मिक उन्नतीशी असतो.
ई. सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु : पुढील कोष्टकात सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु यांच्यातील कर्मामागील इच्छा, एकूण कर्म आणि क्रिया, तसेच कर्म आणि क्रियांचे प्रमाण दिले आहे. कर्म म्हणजे हेतुसहित कृति, तर क्रिया म्हणजे हेतुविरहित कृति. साधनेत जसजशी प्रगति होते, त्या प्रमाणात स्थूलदेह सोडून इतर देहांचे कर्म न्यून होत जात असल्याने एकूण कर्म आणि क्रिया अल्प होत जाते.
संत आणि गुरु
संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु फक्त निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते; परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच; मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात.
गुरूंचे प्रकार१. कार्यपद्धतीनुसार प्रकार : ‘वैद्य तीन प्रकारचे असतात - उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जो वैद्य नाडी पाहून ‘औषध घे’ असे फर्मावून निघून जातो आणि रोगी औषध घेतो किंवा नाही याची काही विचारपूस करत नाही, तो कनिष्ठ वैद्य. जो वैद्य रोगी औषध घेत नाही हे पाहून ‘औषध घेतल्यास तू बरा होशील’, असे नानाप्रकारे गोड गोड बोलून त्याला समजावतो, तो झाला मध्यम वैद्य आणि जो वैद्य रोगी काही केल्या औषध घेतच नाही असे पाहून, त्याच्या छातीवर गुडघा रोवून त्याला जबरदस्तीने औषध घ्यायला लावतो, त्याला म्हणावे उत्तम वैद्य. त्याचप्रमाणे जे गुरु वा आचार्य उपदेश दिल्यानंतर शिष्यांची काही विचारपूस करत नाहीत ते आचार्य किंवा गुरु कनिष्ठ होत. शिष्यांना उपदेश ग्रहण करता यावा, त्यांचे कल्याण व्हावे, म्हणून पुनःपुन्हा त्यांना समजावून सांगतात अन् त्यांच्यावर प्रेम करतात ते मध्यम गुरु; परंतु शिष्य नीट अवधान देत नाहीत किंवा अनुरूप आचरण करत नाहीत हे पाहून जे आचार्य प्रसंगी जोरजबरदस्तीने का होईना, त्यांना तसे करायला लावतात, तेच उत्तम आचार्य होत.’ अर्थात् ही जोरजबरदस्ती स्थूल माध्यमातून नव्हे, तर सूक्ष्मातून केली जाते; म्हणून सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षात येत नाही.
२. अंतर्गुरु आणि बाह्यगुरु : ‘अंतर्गुरु आणि बाह्यगुरु यांच्यात फारसा भेद नसतो. तुम्ही बाह्यगुरूची करत असलेली पूजा वास्तविक तुमच्या हृदयस्थ गुरूलाच पोहचत असते. परमात्म्याला तुम्ही आपले हृदय अर्पण करता; त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करता, त्यापासून तुमच्या अंतर्यामी तुमचाच लाभ होतो. सहस्रदल-मंडलातील त्रिकोणात अंतर्गुरूचा वास असतो, असे गुरुगीतेतही सांगितले आहे -
‘‘अकठादित्रिरेखाब्जे-सहस्रदल मण्डले । हंसपाश्र्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ।। ५८ ।।’’
हा अंतर्गुरु सहस्रसूर्यासमान तेजःपुंज असतो; भेद इतकाच की, बाह्य सूर्यप्रकाशामुळे उष्णता निर्माण होते; पण अंतर्गुरूचा प्रकाश शीतल असतो. ध्यानाच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेणार्या प्रत्येकाला अंतर्गुरूचे दर्शन होते. सहस्रदलातील दिव्य प्रकाशात सतत चमचमणार्या नीलबिंदूच्या रूपाने गुरु वास करत असतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी वास करणार्या गुरूकडून सत्य काय आहे, ते समजले म्हणजे ज्याचे तुम्ही आजवर पूजन करत आलात तो बाह्यगुरु अंतर्गुरूहून भिन्न नसल्याची प्रचीति तुम्हाला येईल.’
एकदा तुमची अंतर्शक्ति जागृत झाली की, मग ती स्वतःच गुरुकृपा बनून तुम्हांला मार्गदर्शन करू लागते. अगदी पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत ती अंतर्शक्तिच तुम्हांला मार्गदर्शन करत राहते. ‘आपण पूर्ण आहोत आणि यापूर्वीही सतत पूर्णच होतो’, याची जाणीव तुम्हांला शेवटी होते.
संकलक - श्री. दत्तात्रेय वाघूळदे, संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’, संपर्क क्र.: 9284027180