नांदेड| जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज सकाळी आभासी पद्धतीने खाते प्रमुख, जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी मुख्यालय हजर राहून दर दोन तासाने आपत्ती अहवाल मोबाईलवर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याबरोबरच पुराचा वेढा पडला आहे काय? तशी शक्यता आहे काय? कोणी शेतकरी शेतमजूर आगर नागरिक शेतात अडकला आहे काय? गावात सखल भागातील पाणी साचून पाणी घरात शिरले असेल अगर तशी शक्यता असल्यास तेथील कुटुंबांना गावातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.
गावातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण दररोज केले पाहिजे, शक्यतो पाणी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना गावातील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून वेळच्यावेळी माहिती देण्याबाबत कळवावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भभवली किंवा काही मदत हवी असल्यास तात्काळ प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि ग्रुपमध्ये तसा मेसेज टाकावा. तसेच सर्व शेतकरी बांधवांना आपली जनावर हे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून पुरामुळे किंवा पाण्यामुळे जनावरे दगावणार नाहीत याची काळजी घ्यावी.
नदी काठच्या गावात सतर्क राहून पाणी असल्यास सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात यावे व प्रशासनाच्या संपर्कात राहावे. गावातील निष्णात पोहणारे, जेसीबी धारक, स्वयंसेवक यांची यादी व मोबाईल नंबर ठेवावे. ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती त्वरित स्थापन करावी अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या प्रमाणे सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उप अभियंता, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी मुख्यालय राहून सुरू असलेल्या संततधार पाऊस व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा जिल्हा परिषदेच्या ग्रुपवर दर दोन तासाला देत आहेत. त्यामुळे प्रशासनाला देखील योग्य व वेळेत माहिती मिळाली आहे. सकाळपासून सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक फिल्डवर काम करत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाबाशकीची थाप दिली आहे.