नांदेड| जिल्ह्यातील टेकड्या हरित करण्यासाठी जिल्हा परिषद व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित टेकडी करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू करण्यात आली.
या अंतर्गत नायगाव तालुक्यातील गंगनबीड परिसरातील टेकड्यांवर शुक्रवार दिनांक 8 जुलै रोजी जिल्हा परिषद नांदेड व वनविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून २५ हजार सिडबॉलचे रोपण करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, वनसंरक्षक केशव वाबळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप विभागीय दंडाधिकारी विकास माने, परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक, पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संरक्षित टेकड्या, मोकळी मैदाने, रस्त्याच्या कडेलगतची मोकळी जागा या ठिकाणी सर्व शाळांच्या वतीने सीडबॉल रोपण करण्याचे कार्यक्रम आखण्यात येत आहेत.
उन्हाळी सुट्टी आणि शाळा आरंभी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी सीडबॉल्सची निर्मिती केली आहे. हरित टेकडी या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व टेकड्यांवर स्थानिक वृक्ष संवर्धन करण्याचा हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम आहे. वटपौर्णिमेलाही जिल्ह्यात एकाच वेळी सर्वत्र 15 हजार वटवृक्षांचे रोपण करण्यात आले होते. हरित नांदेड करण्यासाठीचा हा एक नवखा प्रयोग आहे.