नांदेड| जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात येणाऱ्या मालेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीची बाग कोण्यातरी अज्ञात व्यक्तींनी कत्तल करून नष्ट केली आहे.
मालेगाव येथील शेतकरी चंद्रकांत मुकुंदराव कामेवार आणि बाबूराव राजेवार यांच्या शेतातील दोन हजार केळीच्या झाडांपैकी अंदाजे ६०० केळीची झाडे रात्री अज्ञातांनी कत्तीने तोडून टाकली. येत्या पंधरा दिवसांत पाडण्यासाठी आलेली ही केळीची बाग घडापासूनच कत्तीने तोडून जवळपास ६०० झाडांची कत्तल करण्यात आली. आज केळीचा भाव जवळपास दोन ते अडीच हजार दरम्यान आहे.
यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान केळीचे झाडे तोडून नुकसान करणाऱ्यावर कार्यवाही करावी कारण यापूर्वी सुद्धा या भागात शेतकऱ्यांची केळीचे झाडे तोडून नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.