मुंबई| महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगर परिषदांच्या आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होतील. निवडणूक प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होईल. १९ ऑगस्टला मतमोजणी होईल.
प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला होता. त्यानुसार आता आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील या नगर परिषदा आहेत.
पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी * कमी पाऊस पडणाऱ्या १७ जिल्ह्यांतील आहेत निवडणुका
ऑनलाइन अर्ज व शपथपत्र - १२ जुलै रोजी ओबीसी आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या दिवशी न्यायालयात राज्य सरकार समर्पित आयोगाने बनवलेला ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सादर करण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
न्यायालयाने इम्पिरिकल डेटा मागितला परंतु केंद्र सरकारने डेटा देण्यास नकार दिला. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये याच भूमिकेचा आहे. आजही हीच भूमिका कायम आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उमेदवारी अर्ज तसेच शपथपत्र ऑनलाइनच भरायचे आहे. नोंदणी केल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे.
जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै / उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै / अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै / अर्जांची छाननी : २९ जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत / उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट / मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट /मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट
अ गट : बीड, जालना, उस्मानाबाद, बार्शी, बारामती, भुसावळ ब गट : औरंगाबाद : कन्नड, पैठण | बीड : अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ | लातूर : अहमदपूर, क गट : औरंगाबाद : गंगापूर, खुलताबाद | जालना : अंबड, भोकरदन, परतूर | बीड : गेवराई, धारूर | उस्मानाबाद : भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर | लातूर : औसा, निलंगा