नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पूर परिस्थितीमुळे शेतातील पिके खरडून गेली आहेत, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. काही घरांची पडझड झाली आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवा मदत कार्यात हयगय करु नका, असा सूचना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्या.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खातेप्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीसह अनेक नदी-नाल्यांना पूर आला होता. आसना नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शिवाय अनेक गावांत पुराचे पाणी शिरल्याने घरांची पडझाड झाली तर जीवनावश्यक साहित्य वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना प्रशासकीय स्तरावर केले जाणाऱ्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा, असे निर्देश देतांनाच खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अनेक विभागांचा आढावाही घेतला.
अर्धापूर, नांदेड तालुक्यात तसेच पुर्ण जिल्ह्यात ज्या ठिकाणी पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने तिथे ४८ तासांनंतरही मदत न पोहोचविणा-या अधिका-यांनाही चिखलीकरांनी तात्काळ कार्यवाही करा, असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. महावितरणकडून शेतकयांना पुरविण्यात येणारा डी. पी. शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता पुरवा यापुढे महावितरणने शेतकऱ्यांकडून खर्च मागितल्याचे निदर्शनास आल्यास परिणाम भोगावे लागतील, असेही खासदार यावेळी म्हणाले, जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे रस्त्यांवरील अनेक पूल वाहून गेले आहेत. रस्ते आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हा संपर्क परत सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. त्या त्या नालुक्याच्या अभियंत्यांनी तालुक्यावरच (मुख्यालयी) मुक्काम करावा आणि त्या तालुक्यातील परिस्थिती हाताळावी, असे निर्देश खा.चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व सर्व विभागांना दिले शिवाय जिल्ह्यातील सर्व छोट्या पाझर तलावांची पाहणी करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी काळजी व्यावी, असे सांगतांनाच राष्ट्रीय महामार्ग नांदेड - लातूर - वारंगा या रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचनाही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिल्या आहेत.
बैठकीस आ.राम पाटील रातोळीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद मा.सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाकगेहे, महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव, कार्यकारी अभियंता संजय चाहने, राष्ट्रीय महामागाचे प्रोजेक्टचे सुनिल पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, आर.एम.देशमुख, मलबदे, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भोजराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदींची उपस्थिती होती.