नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा निर्धार -NNL

7 लाख तिरंगा ध्वजाचे केले जात आहे नियोजन, 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत विशेष उपक्रम 


नांदेड, अनिल मादसवार|
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त संपूर्ण नांदेड जिल्हा “हर घर तिरंगा” या विशेष मोहिमेसाठी सज्ज झाला असून जिल्हा प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. यासंदर्भात व्यापक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेतली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे याबाबत आज विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, देगलुरच्या उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, प्रशांत दिग्रसकर कापड व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता सुमारे 7 लाख घरे दृष्टिपथात ठेवली आहेत. प्रत्येक घरावर तिरंगा लागावा यासाठी दिनांक 11 ते 17 ऑगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. “हर घर तिरंगा” साठी प्रत्येक नागरिक आपल्या घरावर तिरंगा लावेल असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक-माध्यमिक शाळा, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका पातळीवर पंचायत समिती, तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यालयाच्या परस्पर सहयोगातून ही मोहिम यशस्वी केली जाईल. “हर घर तिरंगा” या अभिनव उपक्रमात नांदेड जिल्हा आपल्या राष्ट्रकर्तव्याप्रती वेगळी मोहोर उमटवेल असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बोलून दाखविला. 


या मोहिमेला लागणारे ध्वज याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहित केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग घेतला जाईल. प्रत्येक व्यक्तीचे या उपक्रमात योगदान अभिप्रेत असून हा सहभाग स्वतंत्र ॲपद्वारे नोंदविला जात आहे. यासाठी नागरिकांनीही उर्त्स्फूतपणे पुढे येऊन आपल्या घराच्या पत्त्यासह असलेली माहिती https://harghartirangananded.in या लिंकवर भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. सर्वसामान्यांना सहज माहिती भरता येईल असा पद्धतीने हे ॲप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी