जिल्ह्यातील पूर परिस्थितीतून नागरिकांना सावरण्यासाठी जिल्हा प्रशासन घटना स्थळांवर दक्ष -NNL

अनेक गावांचा संपर्क तुटला; राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे पथक सुरक्षेसाठी तत्पर


नांदेड, अनिल मादसवार|
जिल्ह्यात आज रोजी सकाळी 8.20 पर्यंत गत 24 तासात सरासरी 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकुण 510.30 मिमी एवढा पाऊस आजवर झाला आहे. 12 जुलै रोजी जिल्ह्यात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व नदी-नाले पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. आज दिवसभरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचण्यासह जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क हा तुटलेला आहे. किनवट येथे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने तेथील दोनशे लोकांना सकाळी 11 पर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. 


भोकर तालुक्यातील मुदखेड येथेही सिता नदीला पूर आल्याने इजळी येथे दोघेजण अडकून पडली होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले. बिलोली-धर्माबाद रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येसगी येथील पूल वाढत्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी दुपार पासून बंद ठेवण्यात आला आहे. मन्याड नदीला पूर आलेला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून नायगाव व बिलोलीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. 


उमरी तालुक्यात 2 जनावरे, लोहा तालुक्यात 5 जनावरे, सहा घरांची पडजड, देगलूर तालुक्यात दोन गावांचा संपर्क तुटला आहे. कंधार तालुक्यात 2 जनावरे पुरात वाहून मयत झाली तर दोन घरांची पडजड झाली. भोकर तालुक्यात दहा गावांचा संपर्क तुटला. यात नांदा बु, जामदरी, धावरी बु. व धावरी खु, धानोरा, बोरगाव, जाकापूर, हस्सापुर, दिवशी बु, दिवशी खु या गावांचा संपर्क पुलावरून पाणी जात असल्याने तुटला आहे. रेणापूर येथील 15 कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरीत केले आहे. अर्धापूर येथील मौ. सांगवी खु, मेंढला, शेलगाव बु, शेलगाव खु, कोंढा व भोगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. एक जनावर मयत झाले आहे. हदगाव तालुक्यात पुलावरून पाणी जात असल्याने मौ. हरडफ, जगापूर ते जगापूर पाटी, टाकळगाव यांचा संपर्क तुटला आहे. 


वाळकी खु व वाळकी बु मधील लाखाडी नदी पुलावरून पाणी जात असल्याने हदगाव ते हिमायतनगर रस्ता वाहतुकीस बंद पडला आहे. तामसा-भोकर मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद असून वाहतूक बंद आहे. वाळकी बु. गावाच्याकडेला पुराचे पाणी आले आहे. नांदेड येथे पुलावरून पाणी जात असल्याने एकदरा, चिखली बु, कासारखेडा, राहेगाव, धनगरवाडी या गावांचा संपर्क तुटला. आसना-पासदगाव पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद आहे. मौ. धनेगाव येथे एक, आलेगाव येथे एक, ढोकी येथे एक, पोखर्णी येथे एक, लिंबगाव येथे एक, पिंपळगाव येथे एक, पिंपरीमहिपाल येथे दोन, एकदरा येथे सात, पिंपळगाव निमजी येथे एक अशी एकुण 16 घरांची पडझड झाली आहे. भायेगाव येथे एक म्हैस विजेची तार पडून मयत आहे. अतिवृष्टीमुळे पार्डी येथे तीन व हिमायतनगर येथे एक घरपडजड आहे. 

संपूर्ण जिल्हा प्रशासनाला दक्षतेचा इशारा दिला असून 24 तास सहकारी अधिकारी जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आपली अधिकाधिक काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी