नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये २८ ते ३० जुलै, असे तीन दिवशीय गणितीय विज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस देश-विदेशातील नामांकित संस्थेच्या तज्ञांची उपस्थिती लाभणार आहे. या परिषदेचे उद्घाटन २८ जुलै रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये होणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले या परिषदेचे अध्यक्षस्थान भुसवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून या विद्यापीठाचे तथा लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांची उपस्थिती लाभणार आहे. दुसरे सन्माननीय अतिथी म्हणून मथुरा येथील जी.एल.ए. विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिरुद्ध प्रधान यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठता डॉ. एल.एम. वाघमारे, संयोजक व संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार हे असणार आहेत.
या परिषदेमध्ये कॉस्मॉलॉजी, रिलेटिविटी, रिलायबिलिटी, फजी ऑटोमेशन, फ्रॅक्शनल कॅल्कूलस, डिफरेन्शियल थिअरी, सॅम्प्लिंग इ. सारख्या गणितीय विषयावर संशोधक आपले संशोधन मांडणार आहेत. सध्याची संशोधनाची दिशा व त्याची समाजउपयोगी उपयोगिता यावर विस्तृतपणे चर्चा या परिषदेमध्ये होणार आहे. गणित व संख्याशास्त्रातील संशोधन हे गुणात्मक वाढीच्या दृष्टीने फलदायी ठरणारे होणार आहे. जवळपास दोनशेहून अधिक संशोधन लेखाचे सादरीकरण या तीन दिवसीय परिषदेमध्ये केले जाणार आहे. असे गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक तथा संयोजक डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी कळविले आहे.