· विविध विकास कामांचा आढावा
नांदेड, अनिल मादसवार। अर्धापूर शहरातील गजबजलेल्या वस्तीमुळे अनेक भागात विद्युत खांबावरील तारा या धोक्याच्या ठरू पाहत आहेत. लोकांच्या जीविताला प्राधान्य देऊन अर्धापूर येथे भूमिगत विज वाहिन्यांच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
अर्धापूर येथील विविध विकास कामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष पुंडलिक कानोडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तहसिलदार उज्ज्वला पांगरकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे व मान्यवर उपस्थित होते.
वाढत्या नगारिकरणामुळे अनेक शहराची लोकसंख्या वाढत आहे. अर्धापूर शहराची संख्या वाढल्यामुळे या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने हे आरोग्य केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात नगरपंचायतीच्या ताब्यात असलेली अग्निशमन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरपंचायतीला सूचना दिल्या.
प्रत्येक घराला नळाचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टिने पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सद्यस्थितीत नवीन 1 हजार 400 घरांना नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. ही एकुण संख्या 4 हजारापर्यंत अपेक्षित आहे. नव्याने कार्यान्वित झालेली ही पाणी पुरवठा अधिक सक्षम चालावी यादृष्टिकोणातून वार्ड निहाय पाणी किती दाबाने पोहचते हे तपासून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याचबरोबर सदर कामामुळे ज्या-ज्या भागात रस्ते तोडली गेली आहेत त्याची तात्पुरती डागडुजी करून ड्रेनजच्या कामानंतर कायमस्वरुपी ही दुरूस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उर्दू शाळेच्या जागेबाबतही चाचपणी करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.