हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दिनांक 06 जून महाराष्ट्राची शान असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात खास कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांचे स्वागत शब्दसुमनाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते ह्या होत्या. तर प्रमुख शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी विभागाचे प्रमुख प्रो. सूर्यप्रकाश जाधव हे लाभले होते.
तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे आदर्श विद्यार्थी स्वयंसेवक निलेश चटणे व अन्य विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या मनोगतातून महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्या खास वाणीतून सांगत असताना महाराजांच्या राज्याभिषेका विषयीचे विशेष प्रसंग सांगून राजांचा राज्याभिषेक कसा झाला हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका विषयी अभ्यासपूर्ण भाष्य केले. आणि शेवटी आपल्या मंजुळ आवाजात महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.
या सुंदर अशा सोहळ्याचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी प्रास्ताविकासह सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी व तसेच संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदरील कार्यक्रम हा कोवीड- 19 विषयी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.