सेक्युलर व्यवस्थेतून चालणारे अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे!
गोवा| गोमंतकाच्या पवित्र भूमीवर पोर्तुगिजांचे आक्रमण झाले आणि त्यांनी गोव्यातील प्राचीन मंदिरे, धर्मक्षेत्रे यांचा विध्वंस केला. गोव्यातील ‘इन्क्विझिशन’ हे तर त्यांच्या अमानवीयतेचे आणि क्रौर्याचे एक उदाहरण आहे. गोमंतकीयांनी लढा देऊन या विदेशी पोर्तुगिज सत्तेला देशाबाहेर हाकलून लावले. आता स्वतंत्र भारतातील गोमंतकात या विध्वंसाच्या प्राचीन इतिहासाला उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे गोव्यातील विद्यमान सरकारने प्राचीन हिंदू मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे. असा निर्णय संपूर्ण भारतात होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने भूमिका ठरवणे तसेच अशा अनेक समस्यांच्या संदर्भात विचारविमर्श करणे यांसाठी गोव्याच्या पवित्र भूमीत दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन केले आहे.
आज ‘सेक्युलर’ राज्यप्रणालीमुळे हिंदुबहुल भारतात हिंदूंचेच दमन होत आहे. धर्मांतरासाठीच्या दबावातून तामिळनाडूतील ‘लावण्या’ सारख्या हिंदू विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागत आहे. देशभरात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी शोभायात्रांवर कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे केली जात आहेत. हिंदूंवर होणार्या या जीवघेण्या आक्रमणांनंतर उत्तर प्रदेशातील कैरानाप्रमाणे राजस्थानातील करौली भागातील हिंदू गाव सोडून पलायन करत असल्याचे समोर आले आहे. वर्ष 1990 मध्ये काश्मिरमध्ये हिंदूंच्या झालेल्या वंशविच्छेदाप्रमाणे आज वर्ष 2022 मध्येही आतंकवाद्यांकडून हिंदूंची वेचून वेचून हत्या केली जात आहे. एकूणच देशभरातील हिंदु आज असुरक्षित होत चालला आहे, तर दुसरीकडे धर्मांधांची भारताच्या व्यवस्थेविरोधात षड्यंत्रे चालू आहेत.
हिजाबच्या प्रकरणात धर्मांध संघटनांच्या पाठिंब्यावर आवाज उठवणार्या हिजाबी मुली न्यायालयाच्या निर्णयालाही कशा जुमानत नाहीत, हे दिसून आले. इस्लामी श्रद्धास्थानाविषयी विधान केले म्हणून नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध जगातील 57 इस्लामी राष्ट्रे विरोध प्रकट करतात; परंतु शिवलिंगाला ‘फव्वारा’ म्हणून किंवा हिंदू गुप्तांगाची (शिवलिंगाची) पूजा का करतात ? असे हेतुपुरस्सर बोलून हिंदूंच्या धार्मिक भावना डिचवणार्यांच्या विरुद्ध अन्य देश, तर सोडाच भारतातील कोणी सेक्युलरवादी विरोध प्रकट करत नाही. यातून जगात एकतरी हिंदूंचे राष्ट्र का आवश्यक आहे, हे लक्षात येते. तेव्हाच केवळ रामंदिरच नव्हे, तर मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर वा काशी येथील ज्ञानवापीसह हिंदूंची हजारो धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळे हिंदूंना मिळतील!
आज पंजाबमधून वेगळ्या खलिस्तानसाठी पोलीस संरक्षणात खलिस्तान्यांची फेरी निघते, तर तामिळनाडूतही द्रविडीस्तानची मागणी होत आहे. केरळ, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये हिंदु धर्म आणि राष्ट्र विरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आसाममध्ये लक्षावधींच्या संख्येने बांगलादेशी घुसखोर घुसले आहेत. चीन-पाकिस्तान दोन्ही बाजूने एकत्र आले आहेत. एकूणच राष्ट्र संकटात आहे.
असे असले तरी आता हा पूर्वीचा भारत राहिलेला नाही. समस्त हिंदु समाज संघटित होत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अस्पृश्य असलेल्या ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उद्घोष आज सर्वत्र होतांना दिसत आहे. ही एकप्रकारे गोवा येथे दरवर्षी होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची फलश्रुती म्हणावी लागेल. खरे तर वर्ष 1947 मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी होऊन मुसलमानांना पाकिस्तान हा देश मिळाला, तर त्याच वेळी खरे तर उर्वरित हिंदुस्थान अर्थात् भारत हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवा होता; मात्र तसे झाले नाही. याउलट वर्ष 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात सर्व विरोधकांना तुरूंगात डांबून घटनादुरुस्ती करून तत्कालीन काँग्रेस सरकारने कुठलीही व्याख्या नसलेला ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेमध्ये घुसडला. जर घटनादुरुस्ती करून भारताला ‘सेक्युलर’ देश घोषित केले जाऊ शकते, तर पुन्हा अशीच घटनादुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ असे का घोषित केले जाऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार आहे.
हिंदु राष्ट्राची संकल्पना केवळ राजकीय नाही, तर त्यामध्ये आदर्श समाजव्यवस्था आणि जनहितही सामावलेले आहे. याचे कारण हिंदु संस्कृती ही मुळातच विश्वकल्याणाचा विचार करणारी आहे. त्या दृष्टीने समितीने ‘सुराज्य अभियान’ चालवले आहे. या अभियानाच्या अंतर्गत पेट्रोलमध्ये होणारी भेसळ, औषधांमधून ३०० टक्के लाभ मिळवून जनतेची लूट करणार्या औषध कंपन्या, रुग्णांची लूट करणारी धर्मादाय रुग्णालये, मंदिरांमधील भ्रष्टाचार, तसेच भ्रष्ट शासकीय कर्मचारी यांच्या विरोधात आंदोलन उभारले आहे.
हिंदु राष्ट्रासाठी यंदा 12 ते 18 जून या कालावधीत पुन्हा एकदा ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या ‘फेसबुक’, ‘यु-ट्यूब’ आदी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘लाइव्ह’ प्रसारण केले जाणार आहे. देश, संस्कृती रक्षणासाठी आपणही ‘हिंदु राष्ट्रा’च्या या चळवळीत सहभागी व्हा !
- संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 99879 66666)
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)