नांदेड। कोरोना काळात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. विस्कळीत झालेला हा प्रवाह एकसंध करण्यासाठी शिक्षक, पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून काम करणे गरजेचे आहे. 15 जून रोजी सर्व मुले शाळेत येणार असून त्या दिवशी पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत मुलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून त्यांचा गौरव करावा, स्वागत करावे.शाळा पूर्वतयारीचा हा कार्यक्रम त्यासाठीच योजन्यात आला आहे. हीच वातावरण निर्मिती संपूर्ण शैक्षणिक वर्षभर ठेवावी असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.
येथील कुसुम सभागृहात शाळा पूर्वतयारीच्या संदर्भाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ,विषयतज्ञ, फिरते विशेष शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जिल्हा स्तरावरील कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले .
लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, सहसंचालक दत्तात्रेय मठपती ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायटचे अधिव्याख्याते जयश्री आठवले ,श्रीकिसन देशमुख, माणिक जाधव ,जोत्स्ना धुतमल, मंचावर उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, बंडू अामदूरकर, माधव सलगर, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वर्षा ठाकूर -घुगे पुढे म्हणाल्या की, आपण मुलांना बाळकडू कसं देतो त्यावर मुलांचे पुढील भावविश्व आकारत जाते,त्यामुळे मुलांची शैक्षणिक समृद्धी होईल अशा प्रकारच्या शैक्षणिक अध्यापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. शाळाबाह्य मुले मोठ्या प्रमाणावर सर्वत्र आहेत त्या सर्व मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे, टिकविणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे यासाठी सर्वांचेच एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकांना यात सहभागी करून घ्या. पालक मेळावा घ्या. यासह शाळेच्या भौतिक सुधारणा, स्वच्छता ,टापटीप ठेवा पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या परिणामकारक भेटी होणे आवश्यक आहे. अशा भेटीचे नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी अत्यंत ओजस्वी भाषण केले. सर्व सभागृहास एका मंत्रमुग्ध वातावरणात घेऊन आपण सद्यस्थितीमध्ये काय करत आहोत. आणि आपल्याला काय करणे अपेक्षित आहे याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आपली असताना आपण पालकांवर ही जबाबदारी टाकू लागलो तर आपले उत्तरदायित्व राहणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी अधिक परिणामकारक अध्यापन करावे आणि पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी दर महिन्यात ठरवून किमान चार वर्ग तपासले तरी अपेक्षित प्रगती होईल असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास ढवळे यांनी केले. सभेस 450 जणांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक 13 जानेवारीपासून सुरू होणार असून दिनांक 15 जून रोजी विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत यथोचित स्वागत करावे. शाळापूर्वतयारीचा दुसरा टप्पा सुरू होत असून दिनांक 15 जून रोजी सर्व शाळास्तरावर मेळावे घेणे, पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व सर्व मुलांची 100% पटनोंदणी करावी - सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड