प्रहारचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी पावडे यांची मागणी
नांदेड। दरवर्षी बोगस बियाण्यामुळे शेतकर्यांवर दुबार-तीबार पेरणी करावी लागते. ही शेतकर्यांची आर्थिक लूट आहे. कृषी विभागाने बोगस बी-बियाणे विक्री करणार्या कंपनीवर व दुकानदारांवर तात्काळ बंदी घालावी व शेतकर्यांना दर्जेदार बियाणे मिळवून द्यावे. खरीप हंगामात शेतकर्यांना खताची टंचाई जाणवते, अनेकदा ही टंचाई कृत्रिम असते. कृषी खात्यने या खताच्या साठेबाजीला आळा घालून शेतकर्यांना सुरळीतपणे खत पुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी पावडे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दुकानदार शेतकर्यांना चढ्या दराने विक्री करीत आहेत. गोदावरी, सम्राट, उत्तम, बिरला आर.सी.एफ. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा 200 ते 250 रूपये जादा दराने व्यापारी विकत आहेत. बी-बियाणे घेतले तरच खत मिळेल असेही व्यापारी आडमुठेपणाने सांगत आहेत. त्यातही तुलसी सिडस्च्या कबड्डी पंगा बीटी कापसाच्या प्रति बॅगवर 400 ते 500 रूपये जादा दराने विक्री होत आहे.
सध्या बाजारात ओ फॉर्म नसलेल्या ऑर्गेनिक खताची विक्री होत आहे. कृषी खात्याने याकडे लक्ष द्यावे व त्यांचे नमुने घेण्यात यावेत. वरील सर्व मागण्यांचा कृषी विभागाने गांभीर्याने विचार करून शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार बी-बियाणे मिळण्याची व खताच्या साठेबाजीला आळा घालावा. बोगस बी-बियाणे विकणार्यावर कडक कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भरतीय प्रहार युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी पावडे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.