जेंव्हा गोलंदाज फलंदाज व यष्टिरक्षकाला विचारून चेंडू टाकतो -NNL

श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे विभागीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ 


नांदेड|
येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियमला अपरिचित नसणारी पाऊले आज पडली आहेत. प्रत्येक स्पर्धक हा टिमच्यापलीकडे जाऊन विचार करीत प्रतीस्पर्धी संघातील खेळाडुंच्या हाता-हात घालून मैदानाचा अंदाज घेत आहेत. प्रत्येक पाऊले त्यांचे जमिनीत कुठे चढउतार आहेत का याचा अंदाज घेत आहेत. मैदानाचा संपूर्ण आवाका लक्षात घेऊन आता ते आप-आपल्या संघाच्या लाइनमध्ये शिस्तीत उभे झाले आहेत. बॉलमधील छऱ्यांचा आवाज त्यांना खुणावतो आहे. हे सारे खेळाडू अंध आहेत याची उद्घाटनासाठी आलेल्या अपरिचितांना त्यांच्या जवळ गेल्याशिवाय जराशीही कल्पनाही बांधता येत नाही. 

अशा खेळाडुंच्या माध्यमातून कोणालाही प्रेरणा व आत्मविश्वास देणाऱ्या मराठवाडा विभागीय पातळीवरील अंध क्रिकेट स्पर्धेचे आज येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे उपायुक्त कदम, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण संगेवार, क्रिकेट प्रशिक्षक राजू किवळेकर, नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र अंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा अंध क्रिकेटपटू दिलीप मुंडे, कोषाध्यक्ष दादाभाऊ कुटे, प्रशिक्षक मंगेश कामठेकर, सीएबीएमचे माजी अध्यक्ष रवी वाघ, गणेश काळे, डॉ. माधव गोरे, स्टेडियम व्यवस्थापक चवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकुण 4 संघ सहभागी झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2010 पर्यंत महाराष्ट्रातला एकही अंध क्रिकेटपटू पोहचवू शकला नाही. ही खंत मनात घेऊन क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राने निर्धारपूर्वक यात उतरायचे ठरविले. आणि पहिल्याच वर्षी सन 2011 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवटचा दिलीप मुंडे हा अंध खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. त्याच्या पाठोपाठ इतर खेळाडूंनी आपला आत्मविश्वास वाढवित ही संख्या 10 खेळाडूंवर नेऊन  पोहोचविली. नांदेड येथे आयोजित या स्पर्धेतूनही आता आणखी चांगल्या खेळाडूंची भर पडेल असा आत्मविश्वास क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडचे माजी अध्यक्ष रवी वाघ यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी नांदेड वाघाळा महानगर पालिकेने क्रिडांगण मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धा नांदेड येथे घेणे शक्य झाल्याची माहिती उपाध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले. 

स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी - आपल्या क्रिकेट स्पर्धे सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते.  बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जाते, असे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी