माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे यांचे प्रतिपादन; खुरगावला 'पौर्णिमोत्सव' कार्यक्रम उत्साहात साजरा
नांदेड| तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमाचे औचित्य साधून महामानवाच्या नावाचा केवळ जयघोष करीत बसण्यापेक्षा त्यांनी दिलेले विचार, त्याग व समर्पणाची भावना, जगण्याचे सांगितलेले धम्मतत्वज्ञान हे सर्व अंगिकारून विनयाचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे यांनी खुरगाव येथे केले. ते ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू संघरत्न, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, सारीपुत्त, संघानंद, सुयश, कम्मधम्मो, सुगत, सदानंद यांच्यासह डॉ. राजू सोनाळे, डॉ. केतन नांगरे, डॉ. वर्षा सोनाळे, शिवगंगा वाठोडे, प्रा. विनायक लोणे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, निवृत्ती लोणे, शैलजा लोणे, प्रफुल्लता वाठोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरात असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात परित्राणपाठ, धम्मध्जारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण, धम्मदेसना, व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान आदी कार्यक्रम घेण्यात आले.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप आणि पुष्प पूजन करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. भिक्खू संघाकडून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले. त्यानंतर भिक्खू संघरत्न आणि भदंत पंय्याबोधी थेरो यांची धम्मदेसना संपन्न झाली. माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे आणि बुद्धीझम या विषयात लंडनहून पीएचडी मिळवलेले डॉ. केतन नांगरे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. बुद्धमूर्तीचे काम अत्यंत कुशलतेने केल्याबद्दल शिल्पकार मनोहरलाल योगी आणि सूरज चौहान यांचा सुट-कोट देवून भव्य सत्कार करण्यात आला. तसेच दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सुप्रिया लोणे, तनय सोनाळे, तेजस सोनाळे यांचा सत्कार करण्यात आला.
श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात अकरा फुटांची संगमरवरी दगडाच्या अखंड पाषाणात कोरलेल्या आशिर्वाद मुद्रेतील बुद्धमूर्तीचे शिल्पकाम संपले असून या भव्य मुर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे त्यामुळे बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या प्रमाणावर दान करावे असे आवाहन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. दरम्यान, श्रद्धावान उपासकडी.के. सुकेशनी गोधने, कुंदन ठाकूर, प्रबुद्ध काळे, शेख सिकंदर, शिवानंद पर्डे, राजकुमार वाव्हळे, सुमेध गायकवाड, भिमा आवटे, भाऊसाहेब शिनगारपुतळे, टी. पी. साळवे, सुरेश वाठोरे, विजय शंकपाळ, विमलबाई वडणे, निर्मला मतकर, सुरेखा लिंबेकर, अंजली वाटोडे, अभिनय वाटोडे, सुधाकर हनमंते, डिगांबर हनमंते, सिद्धार्थ थोरात यांनी भेट दिली. महाराष्ट्राच्या महागायिका माया खिल्लारे आणि वंदना खिल्लारे यांनी बुद्ध भीम गितांच्या मैफिलीने रंगत आणली. कार्यक्रमाला आंबेडकरनगर, स्वागत नगर, स्वप्नजा गार्डन, श्रद्धा काॅलनी, उज्वल नगरसह शहरातील तसेच परिसरातील विविध ठिकाणांहून बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.