नांदेड| नांदेडच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते डॉ.कृष्ण महादेव जोशी यांचे वृध्दापकाळाने रविवारी, २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी, २७ जून रोजी सकाळी १० वाजता राहते घर,गुजराती हायस्कूलजवळ दिलीपसिंघ कॉलनी नांदेड येथून निघणार आहे. गोवर्धनघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ.कृष्ण महादेव जोशी हे नांदेड जिल्'ातील पहिले नेत्रशल्यविशारद होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण वाराणसीत झाले. त्यांनी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय योगदान दिले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, माधवराव गोळवलकर गुरुजी, सुदर्शन,बाळासाहेब देवरस यांच्यासोबत संघ कार्य केले. त्यांनी अनेक वर्षे हनुमान पेठ वजिराबाद नांदेड भागात नेत्र रुग्णालय चालविले आणि सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह विविध आयामामध्ये सक्रिय योगदानही दिले.
विहिंपचे ते माजी जिल्हाध्यक्ष होते. अभिनव भारत शिक्षण संस्था स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. या संस्थेवर ते आजतागायत पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. या संस्थेचे नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे.अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, मुले धनंजय, शिलादित्य, २ विवाहित मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.