बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश; मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन -NNL


मुंबई|
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, बालगृहातील या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल यश संपादन केले आहे, याचा मला अभिमान आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी  या  विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. बालगृहातील विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा, सुरक्षित वातावरण व कौटुंबिक प्रेम देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. बालगृहातील मुलांच्या  शिक्षणाची जबाबदारी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शनही विभागामार्फत केले जाते.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे पाठविली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात दाखल करण्यात येते. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात पुणे विभागातील बालगृहातील सर्वाधिक १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून औरंगाबाद विभाग १०१ विद्यार्थी, कोकण विभाग ९८ विद्यार्थी, नाशिक विभाग ६१ विद्यार्थी, अमरावती विभाग ५१ विद्यार्थी, नागपूर विभाग ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी  ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के गुण मिळविले आहेत.  १०५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८५ टक्के गुण मिळविले आहेत. १५२ विद्यार्थ्यांनी ६५ ते ७५ टक्के गुण मिळविले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी