महाराष्ट्रातही 'एक व्यक्ती, एक पद' ही संकल्पना राबवणार: नाना पटोले -NNL

आगामी काळात जिल्हानिहाय एक दिवसीय चिंतन शिबिर होणार

देशाचे सार्वभौमत्व व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी संघर्ष करू.


मुंबई/शिर्डी|
उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेत नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशामध्ये सध्या हुकुमशाही  राजवट सुरू आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला असून सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जातीयतेची तेढ निर्माण करून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणले आहे. परंतु लोकशाही व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष प्रभावी काम करत असून दिल्ली संकटात आली त्यावेळेस महाराष्ट्र मदतीला धावून गेला हा इतिहास आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून होणाऱ्या नवसंकल्प कार्यशाळेतून देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी नियोजन केले जाणार आहेत. 

आगामी काळात जिल्हानिहाय एक दिवसीय चिंतन शिबिर होणार असून प्रत्येक जिल्ह्यातून 75 किलोमीटरची पदयात्राही काढली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी,खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील सर्व योजनांची अंमलबजावणी सह्याद्रीच्या कुशीत आणि साईबाबांच्या पवित्र भूमीत असल्या शिर्डी शिबिरातून होत आहे.

या कार्यशाळेत राजकीय, सामाजिक, कृषी, ग्रामीण असे सहा विभाग करण्यात आले असून या सर्व क्षेत्रातील धोरणांवर काँग्रेसचे प्रभारी एच.के .पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा होत असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी