वीजबिल भरा, बक्षीस मिळवा,, मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांसाठी महावितरणची अभिनव योजना -NNL


औरंगाबाद।
वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि नियमित बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी बक्षीस योजना आणली आहे. 1 जून ते 30 ऑगस्टदरम्यान बिल भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेत बक्षिसे जिंकण्याची नामी संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज देण्यासाठी महावितरणने सदैव तत्पर असते. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते. परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणला वीजखरेदीसह इतर खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाईही महावितरणला करावी लागते. मात्र घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि त्यांना नियमित बिल भरण्याची सवय लागावी यासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून एक अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात येत आहे.

या योजनेचा कालावधीत 1 जून ते 30 ऑगस्ट 2022 असा आहे. या तीन महिन्यांत थकबाकीसह संपूर्ण वीजबिल भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत. तिन्ही महिन्यांत बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागणार आहेत. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सोडत काढण्यात येईल. दर महिन्याला मराठवाड्यातील 101 उपविभागातून 1 हजार रुपयांची प्रत्येकी 2 बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. 

ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेटचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे. यासोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर, 9 मंडलांतून प्रत्येकी एक रेफ्रीजरेटर, 3 परिमंडलांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेचा मराठवाड्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांनी लाभ घेऊन आपली वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी