नांदेड| घरोघरी जाऊन कडगेकाकांनी वाचकांना पुस्तके पुरविली, अनेकांना त्यांनी वाचनाची आवड निर्माण केली. त्यांच्या जीवनात आनंद आणला. म्हणून कडगेकाका जसे ग्रंथयात्री होते तसेच ते आनंदयात्रीही होते असे उद्गार माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी काढले.
इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशनास सिद्ध करण्यात आलेल्या व रवि कडगे यांनी संपादित केलेल्या कै. बस्वराज शंकराप्पा कडगे यांच्या जीवनावरील 'ग्रंथयात्री' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डी. पी. सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, साहित्यिक देवीदास फुलारी, डॉ. वृषाली किन्हाळकर, साहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, श्रीमती शांताताई कडगे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कडगेकाकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर रवि कडगे यांनी प्रास्ताविक केले. आपले वडील या जगातून गेल्यानंतर झालेली मनाची अवस्था सांगून हा ग्रंथ प्रकाशित करण्यामागची भूमिका सांगितली. यानंतर 'ग्रंथयात्री'चे प्रकाशन डी. पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशक दत्ता डांगे यांनी हा प्रेरणादायी ग्रंथ निर्माण करताना आलेले अनुभव सांगितले. यावेळी थोर समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.
पुढे बोलताना डी. पी. सावंत म्हणाले की, कडगेकाका मातृह्रदयी होते. असे सर्वच जण झाले तर विश्वाचे कल्याणच होईल. तसेच ते संतवृत्तीचे होते. त्यांनी पदरचे पैसे टाकून गरिबांना मदत केली. त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला आपलेसे केले. त्यांचे स्मरण करून आपणही चांगले काम करू तेव्हा तेव्हा आपल्याला ऊर्जा प्राप्त होईल असे त्यांनी म्हटले. माजी मंत्री माधवराव किन्हाळकर म्हणाले की, कडगेकाका म्हणजे एक साधा माणूस. त्यांची साधी राहणी होती. ते कसल्याच प्रकारची श्रीमंती दाखवीत नसत. त्यांना आपला जन्म कळला होता. ते खरे ज्ञानी होते. कडगेकाकांना स्वतःची ओळख झालेली होती म्हणून ते सर्वांवर प्रेम करीत. एकात्म भाव त्यांच्यात होता. लोकांचे ते कल्याण करीत.
देवीदास फुलारी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, जन्म जेवढा महत्त्वाचा तेवढाच मृत्युही महत्त्वाचा हे कडगेकाकांना कळले होते. ते एक देवमाणूस होते. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले. भ. गौतमबुद्ध, म. बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे दैवत होते. साध्या साध्या गोष्टींतून त्यांनी समाजसुधारणा केली. उदबत्तीसारखा गाभारा त्यांनी सुगंधित केला. लहान-थोरांना आनंदित करण्यासाठी ते कार्य करीत असेही फुलारी यांनी म्हटले.
डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी आपले भाष्य करताना म्हटले की, कडगेकाकांनी विचारांची गुंतवणूक केली. पैसा गुंतविण्याबाबत इतरांना मार्गदर्शन केले आणि ते स्वतः सदैव प्रसन्न असायचे. सहसा कोणत्याही माणसांच्या चांगुलपणाच्या गुणांवर विकार मात करतात. परंतु कडगेकाकांचे याउलट होते. त्यांचा चांगुलपणाचा गुण विकारांवर मात करीत असे यात ते यशस्वी ठरले होते. कडगेकाकांचा आतला प्रवास पाहणेही महत्त्वाचे आहे. त्यांनी आपली दृष्टी आत वळवली होती. यासाठी उपासना, मनाचा निर्धार संयम लागतो तो त्यांच्याकडे होता. त्यांनी बाहेरच्या वाईट गोष्टी बाहेरच थोपविल्या आणि आतली शांतता कायम ठेवली. मधुर बोलण्यातून ती व्यक्त केली असेही त्यांनी म्हटले.
डॉ. अशोक बेलखोडे यांनी कडगेकाका हे माणुसकीचा धर्म पुढे नेणारे होते. ते सदैव चांगले विचार करीत आणि दुसऱ्यांनाही चांगले विचार देत. त्यांच्या काही गोष्टी सर्जनशीलतेच्या द्योतक होत्या असे सांगून कडगेकाकांच्या सोबत आनंदवन येथे गेले असतानाच्या काही आठवणीही सांगितल्या. सुनील हुसे यांनी म्हटले की, जे वाचनालयात येऊ शकत नव्हते अशा वयोवृद्ध वाचकांसाठी कडगेकाका त्यांच्या घरपोच पुस्तके नेऊन देऊन सेवा करायचे. यामुळे कडगेकाकांविषयी आदरभाव निर्माण झाला. म्हणूनच शासकीय ग्रंथालयातर्फे पहिले इ- ओळखपत्र आम्ही कडगेकाकांना दिले. वाचनचळवळीचे ते संवर्धक होते असे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमात प्रकाशक दत्ता डांगे, चित्रकार माधव मठपती, अक्षरजुळणी करणाऱ्या सौ. कलावती घोडके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. उमा मिरजगावे व वीरेश कडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीदेवी कडगे, सौ. निर्मला कल्याणराय, सौ. मीना कडगे, सौ. रजनी कडगे, सौ. रेखा आकमार, सौ. स्वप्ना झंवर, आदींनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. व्ही. घेवारे, गजानन हिंगमिरे, सौ. स्मिता कडगे, डॉ. रमेश आकमार, शिवराज कडगे, डॉ. संतोष कडगे, संजय कडगे, अनुष्का कडगे, समृद्धी कडगे, सौख्या झंवर, शिवम आकमार, गौरी आकम, सौरभ शिवणकर आदींनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रतीक कडगे यांनी
या कार्यक्रमास माजी आमदार गंगाधरराव पटने, देवराव चिंचोलकर, द. मा. रेड्डी, भगवान अंजनीकर, प्राचार्य आर. के. पाटील, शंकर वाडेवाले, शंतनु डोईफोडे, भानुदास पवळे, बाळू दुगडूमवार, बापू दासरी, नीळकंठ पाचंगे, इंजि. इनामदार, प्रा. उदगिरे, के. बी दीक्षित, सौ. जयश्री जैस्वाल, सुषमा माढेकर, जयश्री तोडकरी, श्रीमती मारमपल्ले, व आपुलकी परिवार सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.