श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार त्वरित कारवाई करण्यासाठी -NNL

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तुळजापूर व पुणे येथे आंदोलन !


मुंबई/तुळजापूर/पुणे|
महाराष्ट्राची कुलस्वामीनी मानल्या जाणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी याच्यांवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती तथा समविचारी संघटना यांच्या वतीने  श्री तुळजाभवानी मंदिराजवळील प्रशासकीय कार्यालयासमोरच 31 मे 2022 या दिवशी सकाळी 11 वाजता ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले. याच मागणीसाठी आज पुणे येथेही डेक्कन परिसरातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले.

श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात असूनही तेथे वर्ष 1991 ते वर्ष 2009 या कालावधीत सिंहासन दानपेटीच्‍या लिलावात 8 कोटी 45 लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि उच्च अन् कनिष्ठ पदस्थ शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. या विषयी संभाजीनगर उच्च न्यायालयात हिंदु जनजागृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा अहवाल 20 सप्टेंबर 2017 या दिवशी सीआयडीने गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांना मंत्रालयात सादर झाला; मात्र पाच वर्षे होत आली, दोषींवर कारवाई तर दूरच; साधा अहवालही विधीमंडळात वा बाहेर सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 


या घोटाळ्यात 9 लिलावदार, 5 तहसिलदार, 1 लेखापरिक्षक, 1 धार्मिक सहव्यवस्थापक यांचा सहभाग असून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे; मात्र दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या घोटाळ्यातील एक आरोपी मृत पावला आहे. शासन बाकीचे आरोपी मृत होण्याची वाट पाहत आहे कि दोषींना पाठीशी घालत आहे ? एखाद्याने मास्क घातला नाही, तर शासन 200 ते 500 रुपयांचा दंड सामान्य जनतेकडून वसूल करते. मग 8 कोटी 45 लाख रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर 31 वर्षे झाली तरी कारवाई का होत नाही ? जोपर्यंत या सर्व दोषींवर कारवाई होत नाही, तसेच त्यांच्याकडून अपहार झालेली रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल होत नाही, तोपर्यंत श्री तुळजाभवानी मातेचे भक्त तथा हिंदु जनजागृती समिती हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत, असा इशारा आंदोलनात देण्यात आला.

या ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’त सोमवार गिरी मठाचे मठाधिपती महंत ईच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, श्री. नागेशशास्त्री आंबुलगे, सावरकर विचार मंचचे श्री. बाळासाहेब शामराज, भाजपचे श्री. शिवाजी बोधले, श्री. विकास मलबा, श्री. गुलचंद व्यवहार, जनहित संघटनेचे श्री. अजय (भैया) साळुंके आणि श्री. प्रशांत सोंजी, अधिवक्ता गिरीश लोहारीकर, अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष श्री. अंबादास व्हरडे, सुदर्शन वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख श्री. सागर इंगळे, रिपब्लिकन पक्षाच्या रुपाली महादेव काळभोर, बारामती येथील शेतकरी संघटनेचे प्रवक्ते श्री. अशोक महादेवराव खलाटे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष श्री. दिनेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांसह भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 7020383264) 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी