नांदेड,अनिल मादसवार| मुदत समाप्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहिर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय येथे उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिध्दी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आली आहे.
या आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे हरकती सूचना असतील त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत हिमायतनगर यांचेकडे बुधवार 15 जून ते मंगळवार 21 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.
दहा नगरपरिषदांच्या आरक्षण निश्चितीबाबत 21 जूनपर्यत हरकती व सूचना कराव्यात
मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे हरकती/सूचना असतील त्यांनी कारणासह संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद यांचेकडे बुधवार 15 जून ते मंगळवार 21 जून 2022 दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करावे. मंगळवार 21 जून 2022 रोजी दुपारी 3 नंतर आलेले हरकती/सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमानुसार कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले असून या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिध्दी सर्व संबंधित नगरपरिषेच्या क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर करण्यात आली आहे.