अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन
गोवा| भगवान परशुराम ही देवता गोव्याचे रक्षण करते. गोव्याच्या काळ्या इतिहासातील ‘इन्क्विझिशन’ला कथित संत फ्रान्सिस झेवियर हाच कारणीभूत होता. त्यामुळे गोव्यात 250 हून अधिक वर्षे ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून केलेल्या जुलमी अत्याचारांची सत्य माहिती नव्या पिढीला देणे आवश्यक आहे. यासाठीच ‘गोवा फाईल्स’चा दुसरा भाग गोमंतकीयांच्या समोर ठेवणार आहे, असे प्रतिपादन गोवा येथील ‘भारत माता की जय संघा’चे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकतेचा यशस्वी प्रयोग : हिंदु रक्षा महाआघाडी’, या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर स्वामी आत्मस्वरूपानंद महाराज, पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे उपस्थित होते.
प्रा. सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले, ‘‘गोवा येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी वाढलेली आहे. गोव्यातील अनेक ठिकाणांचा ताबा मुसलमानांनी घेतला आहे. गोवा येथे ‘पॉप्युलर फ्रंट इंडिया’ (PFI) ही कट्टर इस्लामिक संघटना सक्रिय झाली आहे. गोव्यातील धर्मांध मुसलमान मुख्यमंत्र्यांना चेतावणी देऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस करू लागले आहेत. या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवा येथील लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या 350 प्रतिनिधींना घेऊन आम्ही हिंदु रक्षा महाआघाडीची स्थापना केली आहे. धर्मांतराचा विरोध, जिहादचा विरोध, मंदिर सुरक्षा, धर्मशिक्षण, हिंदु संस्कार अशी पंचसूत्री सिद्ध करून त्यानुसार कार्य करण्यात येत आहे. गोवा राज्यातील सर्व संस्था स्वतःचे कार्य करत असतांना या पंचसूत्रींचा त्यांच्या कार्यप्रणालीत अंर्तभाव करण्यात आला आहे.’’
सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! - पू. परमात्माजी महाराज, कर्नाटक
धर्मावर अधर्माचे आक्रमण चालू झाले तेव्हा भगवान परशुराम यांनी परशु धारण केला. अशा भगवान परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही संघर्षाची वेळ आहे. त्यासाठी प्रत्येक संत आणि संन्यासी यांनी हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी. त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन धारवाड (कर्नाटक) येथील पू. परमात्माजी महाराज यांनी केले. ते ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक संस्थांच्या एकतेसाठी केलेले प्रयत्न’, या विषयावर ते बोलत होते.
भारत एक आध्यात्मिक भूमी आहे. भारताचा इतिहास पाहिल्यास भारतामध्ये जेव्हा जेव्हा काही बदल झाला, तो मुख्यतः आध्यात्मिक संस्थांनीच केला आहे. आपल्या देशात आध्यात्मिक संस्था आणि संत यांची संख्या मोठी आहे. हे सर्व हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी वेळ लागणार नाही, असेही पू. परमात्माजी महाराज म्हणाले.
आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! - पूज्य डॉ. शिवनारायण सेन, बंगाल
पूर्वीच्या काळी भारतात शाळा या मंदिरांमध्येच चालवल्या जात होत्या. जवळपास प्रत्येक गावात एक मंदिर होते आणि प्रत्येक गावात एक शाळा होती. एक इंग्रज अधिकारी थॉमस मुन्रो यांच्या अहवालानुसार वर्ष 1826 मध्ये दक्षिण भारतात 1 लाख 28 हजार शाळा होत्या. ज्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्के होते, तर क्षुद्र विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. पुढे हे सर्व इंग्रजांनी बंद केले. आजही भारतात कोणत्याही शाळेत धार्मिक शिक्षण देता येत नाही. त्यामुळे सर्व संस्थांनी एकत्रित येऊन आदर्श चरित्र निर्माण होईल, असे धार्मिक शिक्षण देणे आवश्यक आहे, असे आवाहन बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे उपसचिव पूज्य डॉ. शिवनारायण सेन यांनी केले.
श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती. (संपर्क : 99879 66666)